बाबासाहेबांची संकल्पपूर्ती हाच भिक्खू संघाचा उद्देश

By Admin | Updated: September 14, 2014 01:06 IST2014-09-14T01:06:28+5:302014-09-14T01:06:28+5:30

मानव जातीच्या विकासासाठी बुद्ध धम्माची गरज असून ‘संपूर्ण भारत मी बुद्धमय करेन’ असा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. बाबासाहेबांची ही संकल्पपूर्तीच भिक्खू संघाचा मुख्य उद्देश आहे,

The aim of the Bhikkhu Sangh is to fulfill the ultimate goal of Babasaheb | बाबासाहेबांची संकल्पपूर्ती हाच भिक्खू संघाचा उद्देश

बाबासाहेबांची संकल्पपूर्ती हाच भिक्खू संघाचा उद्देश

राष्ट्रीय शिखर बौद्धधम्म परिषद : संघानुशासक सदानंद महास्थवीर
नागपूर : मानव जातीच्या विकासासाठी बुद्ध धम्माची गरज असून ‘संपूर्ण भारत मी बुद्धमय करेन’ असा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. बाबासाहेबांची ही संकल्पपूर्तीच भिक्खू संघाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन संघानुशासक सत्धम्मादित्य सदानंद महास्थवीर यांनी आज येथे धम्मदेसना देताना केले.
भारतातील बौद्धांच्या संवैधानिक हक्कांच्या व सवलतींच्या प्रश्नांवर देशव्यापी चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने समता सैनिक दलातर्फे रामगोपाल माहेश्वरी हॉल हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय शिखर बौद्धधम्म परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली. संघानुशासक सत्धम्मादित्य सदानंद महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली भिक्खू संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी धम्मदेसना दिली. ‘संपूर्ण भारत मी बुद्धमय करीन’हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यास भिक्खू संघाची भूमिका’ या विषयावर चर्चा करताना सदानंद महास्थवीर यांनी देशातील बुद्ध धम्माच्या एकूणच परिस्थितीवर लक्ष वेधले. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी अनागारिक धम्मपाल यांनी दिलेल्या लढ्याची माहिती दिली. यावेळी भिक्खू डॉ. खेमधम्मो महास्थवीर, भिक्खू डॉ. एन. बोधिरत्न महास्थवीर, भिक्खू चंद्रकिर्ती, भिक्खू आचार्य श्रद्धाशील, भिक्खू नंदवर्धन बोधी यांनीही मार्गदर्शन केले.
भिक्खू कृपाशरण महास्थवीर यांनी संचालन केले. यानंतर ‘धम्म प्रचाराच्या कार्यात भिक्खू संघाला येणाऱ्या अडचणी व त्यांचे निवारण’ या विषयावर भिक्खू सत्यशील महास्थवीर, भिक्खू ज्ञानबोधी महास्थवीर, भिक्खू महापंथ महास्थवीर, भिक्खू डॉ. भदंत ज्ञानदीप महास्थवीर, भिक्खू डॉ. भदंत चिंचाळ मेतानंद, भिक्खू रुपम यांनी मार्गदर्शन केले.
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या
भिक्खू संमेलनामध्ये शनिवारी एकूण १५ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, बौद्ध धम्मासोबत शासनाने भेदभाव बंद करावा, सन्मानाची वागणूक द्यावी, प्रत्येक राज्यात बौद्ध विद्यापीठ स्थापन करावे, विनयपिटक हाच भिक्खंूचा मार्गदर्शक ग्रंथ असून विनयाचे पालन करावे, भिक्खुंसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावी आदी ठरावांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: The aim of the Bhikkhu Sangh is to fulfill the ultimate goal of Babasaheb