‘एम्स’च्या शैक्षणिक सोर्इंची पाहणी

By Admin | Updated: September 4, 2016 02:55 IST2016-09-04T02:55:05+5:302016-09-04T02:55:05+5:30

आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला २०१७-१८ मध्ये सुरुवात होत आहे.

AIIMS 'Academic Survey of India | ‘एम्स’च्या शैक्षणिक सोर्इंची पाहणी

‘एम्स’च्या शैक्षणिक सोर्इंची पाहणी

पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेची चमू नागपुरात : पुढील वर्षापासून सुरू होणार एमबीबीएसचे पहिले सत्र
नागपूर : आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला २०१७-१८ मध्ये सुरुवात होत आहे. त्याकरिता तात्पुरत्या शैक्षणिक, रुग्णालयीन व विद्यार्थ्यांच्या निवासाच्या पायाभूत सोर्इंच्या पाहणीसाठी पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या (पीएमएसएसवाय) संचालकांसह सहा सदस्यीय चमू शुक्रवारपासून नागपुरात आहेत. दोन दिवसांत या चमूने एक रुग्णालय, दोन कॉलेज व विद्यार्थ्यांच्या निवासासाठी दोन वसतिगृहांची पाहणी केली.
‘एम्स’ला आवश्यक असणाऱ्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला पुढील वर्षापासून सुरुवात होत आहे. सुरुवातीला एमबीबीएसच्या ५० जागा भरल्या जातील. यासाठी साधारण चार वर्षांसाठी तात्पुरते कॉलेज व रुग्णालयाची पाहणीसाठी ‘पीएमएसएसवाय’चे संचालक डॉ. सुदीप श्रीवास्तव, दिल्ली एम्सचे डॉ. डी. के. शर्मा, एम्सचे इंजिनिअरिंग सल्लागार व्ही. के. शर्मा, वरिष्ठ आर्किटेक्ट कनोजिया, सैनी व एम्स रायपूरचे संचालक डॉ. नगरकर आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातच नागपूर एम्स समन्वय समितीचे डॉ. विरल कामदार, एम्सचे नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी काही रुग्णालय व कॉलेजची पाहणी करून त्या संदर्भातील अहवाल ‘पीएमएसएसवाय’ला पाठविला होता. याला घेऊन ही चमू शुक्रवारी नागपुरात आली. गेल्या दोन दिवसात या चमूने रुग्णालयासाठी सक्करदरा येथील राज्य विमा मंडळाचे रुग्णालय, कॉलेजसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), नागपूर होमिओपॅथी कॉलेज तर विद्यार्थ्यांच्या निवासासाठी मेडिकलचे नर्सिंग होम व सोशल वेलफेअर वसतिगृहाची पाहणी केली. रायसोनी कॉलेज व नागपूर इंजिनिअरिंग कॉलेज हे लांब अंतरावर असल्याने तूर्तास या प्रस्तावाला दूर ठेवल्याचे समजते. या दोन दिवसीय पाहणीचा अहवाल प्रत्येक सदस्याने सादर केल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल ‘पीएमएसएसवाय’च्या संचालकांना सादर केला जाणार आहे. यामुळे येत्या दहा दिवसांत हा अहवाल मंत्रालयात सादर केला जाण्याची शक्यता आहे.
एम्सचे शैक्षणिक संस्थान व रुग्णालय हे तात्पुरते असले तरी ते ‘एम्स’च्या दर्जाचे रहावे याकडे या चमूचा विशेष भर राहिल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

एम्सच्या आराखड्यासाठी ‘ग्लोबल’ निविदा
सूत्रानुसार, नागपूर एम्सचा आराखडा सर्वात चांगला होण्यासाठी ‘ग्लोबल’ निविदा मागितल्या जाणार आहे. यासाठी आधी ‘ग्लोबल कन्सलटंट’ ठरविले जाईल. यात कोण जास्त चांगले काम करू शकेल याची शहनिशा केली जाईल. ही निविदा पुढील महिन्यात निघण्याची शक्यता आहे.
आॅगस्ट २०१७ पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात
एम्सच्या आराखड्याचा टप्पा फेब्रुवारी २०१७ मध्ये संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून एम्सच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. ‘पीएमएसएसवाय’चे संचालक डॉ. सुदीप शर्मा यांची पहिली पोस्टींग नागपुरात झाली होती. यामुळे त्यांचे नागपूरवर विशेष प्रेम आहे. इतर एम्सपेक्षा नागपूरच्या एम्सला चांगल्यात चांगले करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
एम्स राहणार ९६० खाटांचे
नागपूरचे एम्स हे ९६० खाटांचे असणार आहे. विशेष म्हणजे नुकतेच भटिंडा व इतरही ठिकाणी सुरू होणाऱ्या एम्सच्या खाटांची संख्या ७०० असणार आहे. यामुळे नागपूर एम्सला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे.

Web Title: AIIMS 'Academic Survey of India