रेल्वे स्थानकावरून सहा महिन्याच्या मुलाचे अपहरण
By नरेश डोंगरे | Updated: June 6, 2024 17:14 IST2024-06-06T17:12:41+5:302024-06-06T17:14:04+5:30
Nagpur : आई-वडील नागपूर शहरात भीक मागून करतात उदरनिर्वाह

A six-month-old child was abducted from a railway station
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका गरीब दांपत्याला वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्याशी सलगी साधल्यानंतर तरुण तरुणीने सहा महिन्याच्या शिशुचे अपहरण केले. गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. ज्या शिशुचे अपहरण झाले त्याचे आई-वडील नागपूर शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात.
बुधवारी त्यांना एक तरुण-तरुणी भेटले. तुम्हाला चांगला रोजगार मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्या दोघांनी या भिक्षेकरी दांपत्याला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्या दोघांना शेगावला जाऊ, असे म्हणून रेल्वे स्थानकावर आणले. इथे भिक्षेकरी दांपत्याचे भांडण झाले. त्यानंतर ते फलाट क्रमांक चार वर झोपले. सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यानंतर त्यांना आपले बाळ दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फलाट क्रमांक चार वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तरुण-तरुणी त्या बाळाला घेऊन संत्रा मार्केटकडच्या गेटने पळून गेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची वार्ता पोहोचताच सर्वत्र खळबळ उडाली. रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी रेल्वे स्थानक गाठून घटनेची माहिती घेतली. बाळ आणि त्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या चमू वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आल्या असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.