कोरोना लॉकडाऊन; मलेशियात अडकले नागपूरचे ३७ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 08:26 PM2020-04-05T20:26:33+5:302020-04-05T20:28:18+5:30

नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टचे विद्यार्थी केके कॅरिअर सोल्युशन्स या कन्स्टलटन्सिमार्फत मलेशियात सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी २९ फेब्रुवारीला मलेशियात पोहोचले.

37 students from Nagpur trapped in Malaysia | कोरोना लॉकडाऊन; मलेशियात अडकले नागपूरचे ३७ विद्यार्थी

कोरोना लॉकडाऊन; मलेशियात अडकले नागपूरचे ३७ विद्यार्थी

Next
ठळक मुद्देहॉटेल मॅनेजमेन्टची ट्रेनिंग रखडली पीएमओ, सीएमओकडे मदतीची विनंती

प्रवीण खापरे /
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे सारे जगच स्तब्ध झाले आहे. प्रत्येक देश आपापल्या समस्या निस्तारण्यात व्यस्त आहे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. भारतही आपल्या नागरिकांना जगाच्या कानाकोपऱ्यातून धुंडाळून मायदेशी परत आणत आहे. आतापर्यंट चिन, इटली आणि अन्य देशांत अडकलेल्या नागरिकांना यशस्वरित्या परत आणले गेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या निमित्ताने मलेशियात गेलेले नागपूरचे ३७ विद्यार्थी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत.
साधारणत: नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला आणि म्हणता म्हणता चार महिन्यात या विषाणूने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. जगभरात दहा लाखाच्या वर नागरिक या विषाणूने बाधित झाले असून, ७० हजाराच्या जवळपास रुग्ण दगावलेही आहेत. भारतातही कोरोना बाधितांचा व मृतांचा आकडा वाढत आहे. याच भयावह स्थितीत नागपुरातून मलेशियाम हॉटेल मॅनेजमेण्टच्या विशेष प्रशिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी येणारा प्रत्येक दिवस काढत आहेत. नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टचे विद्यार्थी केके कॅरिअर सोल्युशन्स या कन्स्टलटन्सिमार्फत मलेशियात सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी २९ फेब्रुवारीला मलेशियात पोहोचले. तोवर सबंध जगभरात कोरोनाने थैमान घातला होता. तेथे पोहोचताच प्रशिक्षणाचे सत्र सुरू होणार तोच मलेशियात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. मलेशिया हे जगभरात पर्यटनासाठी ओळखले जाते. येथे जगभरातून लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे, येथे संसर्गाचा धोका मोठा होता. त्याच कारणाने नागरिकांना वाचविण्यासाठी इतर देशांप्रमाणेच १८ मार्च पासून ‘लॉकडाऊन’ पुकारण्यात आला. त्यामुळे इतर औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रासोबतच सर्व शैक्षणिक क्षेत्र कुलुपबंद करण्यात आले. याच लॉकडाऊनमध्ये नागपूरचे हे विद्यार्थी इपोह आणि पेनॉन्ग आईजलॅण्ड येथे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी दहा-दहाच्या संख्येत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहेत. अशा स्थितीत त्यांना दैनिक गरजांची पुर्तता करण्यासाठीही भांडावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे कुणालाच बाहेर पडता येत नाही आणि गरजेच्या वस्तू घेण्यासाठी एकालाच बाहेर पडावे लागत आहे. शिवाय वस्तू घेण्यासाठी फार लांबचा प्रवासही करावा लागत असल्याने, चिंतेत भर पडत आहे. विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी शिक्षण आणि इतर निवडक खर्च घेऊन मलेशियात दाखल झाले होते. आता तो पैसाही संपत आल्याने पुढचे दिवस कसे निघतील आणि लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता असल्याने येणारे संकट कसे निस्तरावे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. याबाबत या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) शी संकेतस्थळावरून मदतीची याचना केली आहे. शिवाय एक व्हीडीओ बनवून तो सर्वत्र प्रसारितही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नसल्याने, हे विद्यार्थी घाबलेल्या अवस्थेत आहेत. या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून विशेष प्रयत्न होण्याची भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.


इथे आम्ही सगळेच बेवारस!
- आम्ही आता सगळेच विवंचनेत आहोत. बाहेर पडता येत नाही. गरजेचे साहित्य घेण्यासाठी एकालाच बाहेर पडावे लागते आणि तेही फार लांब आहे. या सगळ्या महामारित कुणाला आरोग्याची समस्या झाली तर आमच्याकडे लक्ष देणारे कुणीच नाही. आमचे येथे कुणीच नाही. आम्ही सगळेच बेवारस आहोत. ज्या प्रमाणे भारत सरकारने इटली, चिन येथून आपले नागरिक विशेष विमाननाने आणले तशीच मदत आम्हालाही हवी आहे. येथील लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढणार, याची माहिती नाही. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला मदत करावी, अशी भावना विद्यार्थ्यांपैकी एक राज मौर्य याने व्यक्त केली आहे.

Web Title: 37 students from Nagpur trapped in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.