2500 police personnel on the road: Strict bandobast from today | २५०० पोलीस कर्मचारी रस्त्यावर : आजपासून कडक बंदोबस्त

२५०० पोलीस कर्मचारी रस्त्यावर : आजपासून कडक बंदोबस्त

ठळक मुद्देरात्रीपासूनच सुरू झाली नाकाबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेली भयावह स्थिती लक्षात घेत प्रशानाने उपराजधानीत शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर, आज रात्रीपासूनच ६६ ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून सुमारे २५०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना ही माहिती दिली.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा अक्षरश: उद्रेक होत आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या काळात औषध दुकाने, किराणा स्टोअर्स, भाजीपाला, डेअरी वगळून सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील. रस्त्यावर केवळ औषध विक्रेते, प्रयोगशाळा, रुग्णालय, पोलीस, पत्रकार आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांनाच ये-जा करण्यासाठी मुभा देण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा, परीक्षा, विमान प्रवास, बस प्रवास, लसीकरणासाठीही जाता येणार आहे. सर्वांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

गस्त, नाकाबंदीला सुरुवात

शहरात ६६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस आयुक्तालयांतर्गत प्रवेश करणाऱ्या आठ सीमांचाही त्यात समावेश आहे. बंदोबस्ताकरिता शहरात २ हजार ५०० पोलीस तैनात असतील. या काळात ९९ वाहने पोलीस ठाण्यांतर्गत आणि २० वाहने परिमंडळ स्तरावर गस्त घालतील. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या, दंगल विरोधी पथकाच्या दोन तुकड्या आणि ५०० होमगार्ड्सचीही बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली आहे. नागिरकांना अन्नधान्य, भाजी, दूध घेण्यासाठी लांब अंतरावरील दुकानावर जाता येणार नाही. त्यांनी आपापल्या वस्तीतील दुकानातूनच ते विकत घ्यावे, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.

Web Title: 2500 police personnel on the road: Strict bandobast from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.