2.50 crore loss to Mahatma Phule vegetable market | महात्मा फुले भाजी बाजाराचे २.५० कोटींचे नुकसान

महात्मा फुले भाजी बाजाराचे २.५० कोटींचे नुकसान

ठळक मुद्देमनपाच्या कर्मचाऱ्यांमुळे लागली आग : अडतिया असोसिएशनचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा फुले भाजी बाजार अर्थात कॉटन मार्केटमध्ये बुधवारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बाजाराच्या भिंतीलगत गोळा केलेला कचरा जाळल्याने आग लागली. आगीत १८ दुकाने पूर्णपणे जळाली तर ६ दुकाने क्षतिग्रस्त झाली. आगीत २.५० कोटींचे नुकसान झाल्याचे आकलन मनपाच्या अग्निशमन विभागाने केले आहे. व्यापाऱ्यांना भरपाई कोण देणार, असा सवाल महात्मा फुले अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन यांनी केला आहे.
हुसेन म्हणाले, कॉटन मार्केट महात्मा फुले बाजार नावाने प्रख्यात आहे. येथे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २० ते २२ हजार लोकांना रोजगार मिळतो. हा बाजार २९ मार्चपासून लॉकडाऊन अंतर्गत मनपा आयुक्तांनी बंद केला. बाजार गुरुवारी सुरू होणार होता. पण बुधवारी आग लागली. बुधवार, २७ मे रोजी दुपारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बाजाराच्या सुरक्षा भिंतीबाहेर रमण सायन्स सेंटरच्या बाजूला कचऱ्याचा ढीग जाळला. अडतिया लखनलाल गौर यांनी कचरा जाळण्यास कर्मचाऱ्यांना मनाई केली. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी कचऱ्याला आग लावली. त्यामुळे आगीची ठिणगी दुकानावर पडली. दुकाने बंद असल्याने आगीने पेट घेतला. त्यात १८ दुकाने खाक झाली तर ६ दुकाने क्षतिग्रस्त झाली. त्यामुळे दुकानदारांचे २.५० कोटींचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली. बाजार परिसराचे सर्व मार्ग मनपाने बंद केल्याने गाड्या घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. पण काही मार्ग खुले करून गाड्या घटनास्थळी गेल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविले. गाड्या लवकरच पोहोचल्या असत्या तर नुकसान कमी झाले असते. मोठ्या घटनेनंतरही मनपाचे अधिकारी घटनास्थळी आले नाहीत. गुरुवारी संपर्क साधल्यानंतर मनपाचे सहआयुक्त मोरोणे घटनास्थळी आले आणि त्यांनी असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन, सचिव राम महाजन आणि अन्य पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी केली. काही नेत्यांनीही घटनास्थळाची पाहणी करून आगीचे कारण जाणून घेतले. बाजारात जाण्याचे मार्ग बंद असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त करीत बाजार लवकरच सुरू करण्याची घोषणा केली.

Web Title: 2.50 crore loss to Mahatma Phule vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.