पुण्याहून नागपूरकडे धावणाऱ्या २२ रेल्वेगाड्या रद्द ! प्रवाशांची पर्यायी व्यवस्थेसाठी धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:50 IST2026-01-10T14:43:12+5:302026-01-10T14:50:06+5:30
Nagpur : दौंड आणि मनमाडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने पुणे-नागपूर, हमसफर आणि गरीब रथसह अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

22 trains running from Pune to Nagpur cancelled! Passengers rush for alternative arrangements
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दौंड आणि मनमाडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने पुणे-नागपूर, हमसफर आणि गरीब रथसह अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तब्बल २२ दिवस या गाड्या रद्द राहणार असल्याने ४ ते २५ जानेवारी २०२६ या अवधीत प्रवासाचे नियोजन करून असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
मकर संक्रांती, वसंत पंचमी आणि २६ जानेवारीचे पर्व पुढ्यात आहे. याशिवाय लग्न समारंभआणि वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने ऐनवेळी धावपळ नको म्हणून हजारो प्रवाशांनी नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर विविध रेल्वे गाड्यांचे रिझर्वेशन करून ठेवले आहे. अशात आता मध्य रेल्वे प्रशासनातून माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान मार्ग दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये 'प्री-नॉन इंटरलॉकिंग' आणि 'नॉन- इंटरलॉकिंग'चे काम करण्यात येत आहे. ४ जानेवारीपासून सुरू झालेले हे काम सलग २५ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या २२ दिवसांच्या कालावधीत पुणे-पंढरपूर, पुणे नागपूर, पुणे अमरावती मार्गावर धावणाऱ्या ३० पेक्षा जास्त गाड्या रद्द केल्या आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत.
अनेकांचे नियोजन कोलमडले
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पुणे-नागपूर-पुणे गरीब रथ एक्स्प्रेस, पुणे-अजनी हमसफर एक्स्प्रेस, अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे.
डेली अपडाउनवालेही अस्वस्थ
हा नागपूर-पुणे-नागपूर अत्यंत गर्दीचा रेल्वे मार्ग मानला जातो. नोकरी, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय तसेच तैयक्तिक कारणांसाठी दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने रोज अपडाउन करणारांची संख्याही लक्षवेधी आहे.