१९०० क्विंटल तूर डाळ जप्त

By Admin | Updated: April 24, 2016 10:31 IST2016-04-23T02:58:22+5:302016-04-24T10:31:12+5:30

बाजारात तूर डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी पुन्हा कारवाईला सुरुवात केली.

1900 quintals of tur dal seized | १९०० क्विंटल तूर डाळ जप्त

१९०० क्विंटल तूर डाळ जप्त

डाळीच्या साठ्यांवर पुन्हा धाडी : जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई
नागपूर : तूर डाळीचा साठा करून कृत्रिम भाववाढ निर्माण करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस आल्यावर शासन व प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत गोदामांवर धाडी टाकून तूर डाळीचा साठा जप्त करण्यात आला होता. महिनाभर ही कारवाई चालली. नंतर मात्र कारवाई थंड पडली. परंतु प्रशासनाने पुन्हा डाळींच्या साठ्यांवर धाडी टाकायला सुरुवात केली असून शुक्रवारी टाकलेल्या धाडीत तब्बल १९०० क्विंटल तूर डाळीचा साठा जप्त करण्यात आला.
बाजारात तूर डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी पुन्हा कारवाईला सुरुवात केली. कामठी तालुक्यातील मौजा लिहिगाव येथील लक्ष्मी वेअर हाऊसच्या गोदामामध्ये टाकलेल्या धाडीमध्ये १९०० क्विंटल तुरीचा साठा जप्त केला. कामठी तालुक्यातील मौजा लिहिगाव येथे लक्ष्मी वेअर हाऊस या नावाने अन्नधान्य साठवणुकीसाठीचे गोदाम असून त्या ठिकाणी कळमना येथील मे. योगेश इंडस्ट्रीजने १९०० क्विंटल तुरीचा साठा अनधिकृतपणे साठवून ठेवला होता. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला माहिती मिळाली असता त्यांनी धाड टाकली. जप्त करण्यात आलेल्या या डाळीच्या साठ्याची अंदाजे किंमत ८,७०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे १ कोटी ६५ लाख ३० हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी एन.आर. वंजारी, पुरवठा निरीक्षक प्रशांत शेंडे, प्रज्ज्वल पाथरे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 1900 quintals of tur dal seized