डॉक्टर श्रीराम लागू- अभिनयाचं विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 06:04 AM2019-11-17T06:04:00+5:302019-11-17T06:05:06+5:30

‘माझ्या थीम कॅलेंडरच्या निमित्ताने विविध नामवंतांना त्यांचे फोटो काढण्याची परवानगी मागणारे पत्र  मी पाठवले होते. पत्र मिळाल्यावर  लगेचंच डॉ. लागू यांचा फोन आला. फोटोसाठी परवानगी देताना  मिस्कीलपणे ते म्हणाले,  ‘म्हणजे आधी तुम्ही फोटो काढणार आणि नंतर आम्हाला टांगणार तर !’  दुसर्‍याच दिवशी त्यांनी घरी भेटीची  वेळही दिली. वर्षानुवर्षांच्या  तपश्चर्येने आलेली सहजता. बरोबरच चेहर्‍यावरचे सुंदर हास्य.  पहिल्या तीन-चार फ्रेममध्येच  हवी असलेली त्यांची मुद्रा  कॅमेराबद्ध झाली होती !. 

The unique memories of great actor Dr. Shriram Lagu on his birthday by Sateesh Paknikar | डॉक्टर श्रीराम लागू- अभिनयाचं विद्यापीठ

डॉक्टर श्रीराम लागू- अभिनयाचं विद्यापीठ

Next
ठळक मुद्देदि. 16 नोव्हेंबर हा डॉ. र्शीराम लागू यांचा जन्मदिन. त्यानिमित्त.

- सतीश पाकणीकर

‘मेरे को डराता है क्या? इतना बरस तेरे को पाला. अब मैं बुढ्ढा हो गया तो मेरे को ताकद दिखाता है क्या? साssला.. हरामी..’ हे वाक्य सिनेमातल्या त्या दारूड्याच्या तोंडून बाहेर पडतं. त्याच्या चेहर्‍यावरचे ते लाचार, अगतिक आणि तरीही खुन्नस घेणारे अशक्य भाव. त्याच्या आवाजातला तो विखार समोर असलेल्या आणि त्यानीच लहानाचा मोठा केलेल्या त्या मुलाच्या कानात विजेच्या लोळासारखा शिरतो आणि तो ‘महानायक’ही हतबल होऊन जातो. ‘लावारिस’ चित्नपटातील या दृश्यात ‘लार्जर दॅन लाइफ’ अशी प्रतिमा असलेला अमिताभही समोरच्या या ‘नटसम्राटा’पुढे नतमस्तक होतो. अशी कितीतरी दृश्ये रसिकांनी अनुभवली आहेत.
डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अशा शेकडो भूमिका माझ्या मनात मी आठवत होतो. अशा आभाळाएवढय़ा अभिनयसम्राटाकडे मला जायचे होते. फोनवर वेळ ठरली होती. ते खूपच वक्तशीर आहेत याचीही मला कल्पना असल्याने मी वेळेच्या पाच मिनिटे आधीच नवसह्याद्री सोसायटीमधील त्यांच्या घराच्या खाली थांबलो होतो. दिवस होता 10 फेब्रुवारी 2001. दोनच महिन्यांनी म्हणजे 11 एप्रिल 2001 रोजी पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात माझ्या प्रकाशचित्नांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. प्रदर्शनाचं नाव होतं ‘स्वराधिराज’. अर्थात यात होत्या रसिकांवर स्वरांचा एकछत्नी अंमल गाजवणार्‍या पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरमुद्रा ! भीमसेनजींनी नुकतेच 80व्या वर्षात पदार्पण केलेलं. त्यामुळे त्यांच्या येणार्‍या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने हे प्रदर्शन. ‘स्वरसम्राटा’च्या या प्रदर्शनाला उद्घाटकही तसाच तोलामोलाचा हवा ना? म्हणूनच मी ‘नटसम्राटा’ला विनंती केली होती. आणि त्यांनी मला भेटायला बोलावले होते.
मी त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून अनेकवेळा पाहिले होते, त्यांचे त्या कार्यक्रमांत फोटोही टिपले होते; पण प्रत्यक्ष ओळख झालेली नव्हती. त्यामुळे मनांत जरा धाकधूक होत होती. त्यांनी स्वत:च दरवाजा उघडला आणि स्वागत केलं. रंगमंचावरील किंवा चित्नपटाच्या रूपेरी पडद्यावरील त्यांचा आवाज आणि हा स्वागत करणारा आवाज यात जराही फरक नव्हता. स्वागतात नाटकीपणाचा लवलेशही नव्हता. मी प्रदर्शनाविषयी सांगण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करीत असतानाच डॉक्टर म्हणाले - ‘मी वर्तमानपत्नात आलेले, तुम्ही काढलेले फोटो पाहिले आहेत. कुमारजींवरील माझ्या व्याख्यानाच्यावेळी लावलेले फोटो तुमचेच होते ना? मला आवडले होते ते !’ मी त्यांना होकार दिला आणि मनोमन कुमारजींना धन्यवादही. सुरुवात तर छान झाली होती. मग मी प्रदर्शनाविषयी सांगितले. कलादालनात ‘स्वराधिराज’ या नावाने फोटोंचे प्रदर्शन व त्याबरोबरीने वर्षभर त्याच नावाने जगभरातील रसिकांसाठी वेबसाइटही. त्यांना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी उद्घाटक म्हणून यायचं कबूल केलं. पण एक अडचण होती. उद्घाटन 5 वाजता होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता त्यांना नाटकाची तालीमही होती. मी त्यांना अध्र्या तासात म्हणजेच साडेपाच वाजता रिकामं करण्याची हमी दिली आणि विचारलं की- ‘तुम्हाला न्यायला किती वाजता येऊ?’ चष्म्याच्या दोन्ही काड्यांवर बोटं येतील असे गालावरती हात ठेवत त्यांनी उत्तर दिलं - ‘कोणीही मला न्यायला यायची गरज नाही. मी स्वत:च तेथे पोहोचेन आणि मग तालमीला जाईन.’ 
11 एप्रिलच्या संध्याकाळी पाचला पंधरा-वीस मिनिटे कमी असतानाच डॉ. श्रीराम लागू कलादालनात हजर झाले. मला म्हणाले, ‘मी प्रदर्शन आधीच पाहीन. कारण नंतर कदाचित वेळ मिळणार नाही.’ त्यांनी प्रदर्शन पाहिले. तितक्यात पं. भीमसेनजी त्यांच्या कुटुंबीयांसोबत तिथे आले. नटसम्राटाने स्वरसम्राटाचे स्वागत केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. सर्व ठरलेले असल्याने पंचवीस मिनिटात उद्घाटनाचा कार्यक्रम संपलाही. डॉक्टरांच्या भाषणात त्यांनी त्यांचा अभिप्राय दिला - ‘या प्रदर्शनात केवळ छायेचा किंवा प्रकाशाचा जो खेळ आहे त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न नाहीये तर, मला वाटतं भीमसेन जोशी यांच्या अंतरंगातल्या प्रकाशाचा वेध घेण्याचा तो एक शोध आहे. म्हणूनच याला प्रकाशचित्नांचं प्रदर्शन म्हणणं फारच सर्मपक आहे.’ आटोपशीर कार्यक्रमानंतर चहा-पान होतं. डॉक्टर मला म्हणाले, ‘मी आता निघतो.’ ते चहा-कॉफी काहीच घेत नसल्यानं मी त्यांना शीतपेय घ्याल का असं विचारलं. त्यावर ते लगेचच म्हणाले, ‘आपलं असं कुठं ठरलं होतं?’ त्यांनी काही घेतलं नाही याच्या रुखरुखीपेक्षा मला मी त्यांना दिलेल्या वेळेत कार्यक्रम संपला याचा आनंद जास्त झाला होता.
माझ्या थीम कॅलेंडरच्या प्रवासास 2003 साली सुरुवात झाली. पहिल्याच कॅलेंडरला मिळालेल्या रसिकांच्या प्रतिसादामुळे उत्साह दुणावला होता. आता नवी थीम कोणती घ्यायची असा मी विचार करत होतो. माझ्या लक्षात आलं की औद्योगिक प्रकाशचित्नण करताना मी अनेक दिग्गज व्यक्तींचे प्रकाशचित्नण केले आहे. ही प्रकाशचित्ने वापरून जर कॅलेंडर केले तर ते लोकांना नक्की आवडेल, या विचारातून निर्माण झाले ‘दिग्गज’ हे कॅलेंडर. वेगवेगळ्या क्षेत्नात महनीय काम केलेल्या व्यक्तींच्या भावमुद्रा ! या कॅलेंडरमध्ये अभिनयाच्या क्षेत्नात मोठे योगदान दिलेली व्यक्ती होती ती म्हणजे डॉ. श्रीराम लागू. मी त्यांचे फोटो टिपले होतेच. पण या कॅलेंडरच्या निमित्ताने जर परत काही प्रकाशचित्ने घेता आली तर?. हा विचार मनात होता.
नोव्हेंबर 2003 उजाडला. नुकतीच दिवाळी होऊन गेली होती. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मी त्या त्या व्यक्तींना परवानगी विचारणारी पत्ने पाठवली होती. तसेच पत्न मी डॉक्टरांनाही पाठवले होते. 3 नोव्हेंबर. माझ्या घरच्या फोनची रिंग वाजली. पलीकडून आवाज आला, ‘‘ सतीश पाकणीकर का? मी डॉ. लागू बोलतोय. आत्ताच मला तुमचे पत्न मिळाले. मलाही तुमच्याकडून फोटो काढून घ्यायला नक्की आवडेल. मी पुढचे 
काही दिवस पुण्यातच आहे. फोन करून केव्हाही या. मी वाट पाहतो. आणि हो, कॅलेंडरमध्ये फोटो वापराबद्दल तुम्ही परवानगी मागितली आहे. म्हणजे आधी तुम्ही फोटो काढणार आणि नंतर तुम्ही आम्हाला 
टांगणार तर?’ असे म्हणत ते दिलखुलास हसले. मी लगेचच दुसर्‍याच दिवसाची त्यांची वेळ घेतली.
ठरल्या वेळी मी माझे फिल्म व डिजिटल दोन्ही कॅमेरे घेऊन त्यांच्या घरी हजर झालो. निळसर रंगाचा बंडीवजा अंगरखा व पायजमा या वेशात असलेले डॉक्टर मला म्हणाले - ‘कुठे फोटो काढायचे हे तुम्ही जागा बघून ठरवा. मी तयार आहे.’ मला त्यांचे क्लोज-अप घ्यायचे असल्याने कपड्यांबाबत मला काळजी नव्हती. पण प्रकाशाची दिशा मला महत्त्वाची होती. त्यांच्या एका खोलीला असलेल्या बाल्कनीने माझा तो प्रश्नही सोडवला. परावर्तित होऊन येणारा सौम्य असा प्रकाश आणि दूरवर असलेली हिरवीर्जद झाडी. आता मला फारसा वेळ लागणार नव्हता. माझे मॉडेल हे नाट्य-सिनेसृष्टी गाजवलेली व्यक्ती असल्याने मला वेगळे काही सांगण्याची गरज नव्हती. मी तयार आहे असे सांगितल्यावर डॉक्टर बाल्कनीच्या एका बाजूला जात अलगद माझ्या फ्रेमच्या चौकटीत येईल, असे उभे राहिले. वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येने आलेली सहजता. बरोबरच चेहर्‍यावरचे सुंदर हास्य. पहिल्या तीन-चार फ्रेम घेतल्यावर माझ्या लक्षात आले होते की, आपल्याला हवी असलेली त्यांची मुद्रा कॅमेराबद्ध झालीय. पण तरीही मग इतर काही पोझ देत साधारण वीस मिनिटात फोटोसेशन पूर्ण झाला.
आम्ही परत आतल्या दिवाणखान्यात आलो. त्यांनी कोणाला तरी हाक मारून चहा सांगितला. आम्ही सोफ्यावर बसलो. डॉक्टर म्हणाले, ‘तुमच्याच विषयातला एक प्रश्न विचारू का?’ माझी धडधड वाढली. त्यांनी मला परत आतल्या खोलीत बोलावले. तेथे एक प्रकाशचित्न लावलेले होते. बालगंधर्व कलादालनात नुकत्याच भरलेल्या एका प्रदर्शनातील फोटो होता तो. मीही ते प्रदर्शन बघितले असल्याने मला तो फोटो माहीत होता. कैलास-मानसरोवर येथील कैलास पर्वत, त्याच्या मागून उगवणारे जरा जास्तच मोठे भासणारे पौर्णिमेचे चंद्रबिंब, सरोवराच्या पाण्यात पडलेले त्याचे प्रतिबिंब, मनाला प्रसन्नता देणारी निरव शांतता असे ते प्रकाशचित्न. प्रदर्शनात तर ते भिंतीच्या आकाराइतके मोठे केलेले. बघताक्षणी कोणाच्याही मनात घर करेल असे. फक्त त्यात एकच चूक झाली होती, ती म्हणजे चंद्राच्या त्या पूर्णबिंबाच्या सभोवताली चांदण्याच चांदण्या दिसत होत्या. त्यांनी मला प्रश्न केला की - ‘असा चंद्रोदयाचा फोटो मिळू शकतो का? इतक्या चांदण्या पौर्णिमेला दिसतील का?’
बरीच जास्त फोकल लेन्थ असलेल्या लेन्सने काढलेल्या त्या फोटोतील ही क्लुप्ती त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती. मी तो फोटो कोणत्या प्रकारे एडिट केला असेल याचा तपशील त्यांना सांगितल्यावर त्यांचे समाधान झाले. इतक्यात चहा आला. माझ्या मनातही एक प्रश्न बरेच दिवस होता. आता तो त्यांना विचारावा असे मन म्हणू लागले. त्या प्रश्नाने ते चिडतील का, असा विचारही माझ्या मनात डोकावून गेला. 1999 सालात मी त्यांचे ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटक दोनदा बघितले होते. नाटक सुरू झाल्यावर साधारण पंधरा-वीस मिनिटांनी डॉक्टर म्हणजे नाटकातील ‘सॉक्रेटिस’, एक खूपच मोठा संवाद म्हणतात. तो संवाद सुरू झाल्यावर त्यांचे डोळे लुकलुकू लागतात आणि अंधारात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटू लागते की, हा सॉक्रेटिस जणू फक्त आपल्याशीच बोलतोय. एरवी डॉक्टरांची सतत हलणारी मान त्या एवढय़ा मोठय़ा संवादात जराही हलत नाही हे माझे निरीक्षण होते. विचारावा का हा प्रश्न त्यांना? मग मी धाडस करण्याचे ठरवले. आणि एका दमात माझे म्हणणे त्यांना सांगून टाकले. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत खालचा ओठ दातांमध्ये एकदा दाबून बोलायला सुरु वात केली. ‘त्याचं असं आहे की, नाटकातील अशा वेळी, अशा मोठय़ा संवादात मी त्या अंधारात एखादा पॉइंट ठरवतो. त्या पॉइंटवर मी आधी माझी नजर स्थिर करतो. मग मी बोलायला सुरुवात करतो. तो पॉइंट माझा आधार असतो. आणि मग माझी हलणारी मान माझ्या मनाचे इशारे ऐकायला लागते आणि स्थिर होते.’ एका नटसम्राटाने त्याच्या नव्याने उद्भवलेल्या आजारावर केलेली मात मी साक्षात त्याच्याच तोंडून ऐकत होतो. रंगभूमीबाबतची त्यांची पराकोटीची निष्ठा अशा कामी त्यांच्या मदतीस येत असेल का? जराही आडपडदा न ठेवता असे उत्तर मला मिळेल याची कल्पना नसलेला मी अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच बसलो.
‘दिग्गज’ प्रकाशित होताना त्यांना त्या कार्यक्रमाला यायची खूप इच्छा होती. त्यांनी मला तसे ते बोलूनही दाखवले. पण त्याच दिवशी त्यांच्यातर्फे त्यांच्याच दिवंगत मुलाच्या नावाने दिल्या जाणार्‍या ‘तन्वीर’ पुरस्काराचे वितरण असल्याने ते येऊ शकले नाहीत.
कॅलेंडरमध्ये त्यांच्या प्रकाशचित्नाखाली आमच्या अजित सोमणसरांनी डॉक्टरांचं यथार्थ वर्णन करणार्‍या ओळी लिहिल्या होत्या- ‘रंगमंचावरच्या नाटकी खेळाला तर्कशुद्ध विचाराचं अधिष्ठान देणारा नटसम्राट आणि सामाजिक विचारवंताच्या भूमिकेत नाटक न करणारा सच्चा नागरिकही !’ 

sapaknikar@gmail.com                                   
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: The unique memories of great actor Dr. Shriram Lagu on his birthday by Sateesh Paknikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.