‘अ’ दर्जाकडून ‘ढ’ हाेण्याकडे महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय शिक्षणाचा दर्जा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 09:45 AM2023-07-16T09:45:50+5:302023-07-16T09:47:31+5:30

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कामगिरी श्रेणीकरण निर्देशांकामध्ये राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आरसा दाखविण्यात आला असून, त्यातील आकडेवारी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.

From 'A' grade to 'D' grade, Maharashtra, where has the quality of education been taken? | ‘अ’ दर्जाकडून ‘ढ’ हाेण्याकडे महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय शिक्षणाचा दर्जा?

‘अ’ दर्जाकडून ‘ढ’ हाेण्याकडे महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय शिक्षणाचा दर्जा?

googlenewsNext

डाॅ. उमेश दे. प्रधान 

महाराष्ट्राने असे का घडत आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. प्रगत राज्याला शैक्षणिकदृष्ट्या असमाधानकारक ‘प्रचेष्टा ३’ परिणामात (३१ ते ४० टक्के गुणांमध्ये) का जाऊन पोहोचावे लागले आहे, याचा परामर्श घेणे आवश्यक आहे. ‘अ’ दर्जाकडून निकृष्टतेकडे जाणे परवडणारे नाही. त्यातील पहिला मुद्दा स्पष्ट आहे, तो म्हणजे अध्यापनाची मूळ समस्या सोडून शिक्षकांना इतर शिक्षण पूरक साहित्यामध्येच जास्त लक्ष घालावे लागणे. त्यामुळे होतेय असे की, वर्गाध्यापनासह आधार कार्ड जोडा, शालाबाह्य विद्यार्थी गोळा करा, मध्यान्ह भोजन व्यवस्था पाहा यासारख्या अनेक गोष्टींची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे, कोरोनानंतरच्या काळात दिसून आलेला शिक्षकांना अपेक्षित अशा प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अभाव. सगळे काही ऑनलाइन आणि डिजिटल करण्याच्या घाईगडबडीत अपेक्षित माहिती आणि ज्ञान पोहोचलेच नाही, असे तर नाही. जे प्रत्यक्ष भेटीतून घडणेसुद्धा दुरापस्त आहे ते ऑनलाइन पद्धतीने कसे साध्य होणार? आजही संगणक हाताळणीच्या बाबतीत, शिक्षकांची तंत्रज्ञान साक्षरता झालेली आहे, असे म्हणणे धाडसाचेच होईल.

शिक्षण व्यवस्थेतील दुरवस्थेवर अंकुश ठेवण्याचे काम ज्या पर्यवेक्षीय कार्यक्रमातून शक्य होते तेच नेमके कमकुवत असल्याचे जाणवते. प्रत्यक्ष वर्गाध्यापनाचे निरीक्षण, विश्लेषण होत नसल्याने प्रत्याभरणाची सोयच राहिली नाही. त्यामुळे शिक्षक वर्गात काय करतो आहे? त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे का? याचे अवलोकन करणे अवघड झाले आहे. ना याचे शासन स्तरावर नियोजन, ना शालेय. शिक्षण क्षेत्रातील राजकारणाच्या वाढत्या हस्तक्षेपाचा अनुभव तर रोजचाच बनत चालला आहे. 

राजकीय उलथापालथीत राज्यातील शिक्षणाची आबाळ होते आहे. सर्वच बाबतीत शासनाकडून निर्णय येत असल्याने शिक्षकाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली तर नवल काय? ऑनलाइन करायच्या कामांची व त्याच्या पूर्ततेची लगबग यात शिक्षक पुरता त्रासून जातो आणि अध्यापन प्रक्रियेपासून दुरावला जातो. सारे लक्ष संगणकात, माहिती भरण्यातच वेळ जातो आणि पूर्वीसारखे कागदी घोडे नाचवण्यातच खरे चित्र बाजूला पडते. विचार करायला हवा या साऱ्याच गोष्टींचा आणि कृतीही. 

महाराष्ट्र कुठे होता, कुठे आला?
वर्ष     श्रेणी     गुण
२०१८- १९     अ     ८२१-८८०
२०१९-२०     अ     ८८१-९४०
२०२०-२१     द्वितीय     ७६१-८२०
२०२१-२२     प्रचेष्टा-३     ५८१-६४०

‘प्रचेष्टा ३’ श्रेणी म्हणजे काय? 
‘प्रचेष्टा ३’ ही श्रेणी मिळणे म्हणजे एक प्रकारची नामुष्की आहे. शिक्षण क्षेत्रातील कामगिरीत आपण कसे नापास झालो, याचा केंद्र सरकारने दिलेला हा पुरावा आहे. ‘प्रचेष्टा ३’ ही श्रेणी एकूण निर्देशांकात नीचांकी स्तरावर असते. गुणांच्याच भाषेत सांगायचे तर महाराष्ट्राची कामगिरी १०० पैकी ३१ ते  ४० गुण मिळावे, अशी आहे. कसे म्हणवून घेणार आपण सुशिक्षित महाराष्ट्र? 

(लेखक इंग्रजी अभ्यास निर्मिती मंडळाचे माजी समन्वयक सदस्य, आहेत) 

Web Title: From 'A' grade to 'D' grade, Maharashtra, where has the quality of education been taken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.