भक्ती, उत्साहाचा कावड महोत्सव : ७५ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:50 PM2019-08-24T23:50:25+5:302019-08-24T23:52:53+5:30

कावड महोत्सव अकोला शहरापूरताच मर्यादित राहिला नसून, जिल्हाभरातून कावड या महोत्सवात सहभागी होतात. जिल्ह्यातील विविध गावातील अनेक मंडळ कावड काढून राज राजेश्वराला जलाभिषेक करतात.

Devotional, enthusiasm Kawad Festival: 75 year tradition | भक्ती, उत्साहाचा कावड महोत्सव : ७५ वर्षांची परंपरा

भक्ती, उत्साहाचा कावड महोत्सव : ७५ वर्षांची परंपरा

Next

संपूर्ण राज्यात ज्याप्रमाणे गणेश व नवदुर्गा उत्सव साजरा होतो, त्याचप्रमाणे किंवा त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात अकोला जिल्ह्यात श्रावण महिन्यात कावड महोत्सव साजरा होतो. जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वराला श्रावणातील चवथ्या सोमवारी हजारो कावडधारी जलाभिषेक करतात.
कावड महोत्सवाची सुरुवात सन १९४४ च्या दरम्यान झाली. सध्या जुने शहर असलेल्या भागातच त्यावेळी अकोल्यात वस्ती होती. त्यावेळी नबाबपुरा (सध्याचे शिवाजी नगर) भागात धार्मिक व राजकीय कार्यक्रम पार पडत होते. सन १९४२- ४३ दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यावेळी अकोल्यातही दुष्काळ होता. यावेळी नबाबपुरा भागातील काही तरूणांनी पाऊस येण्याकरिता चौकामध्ये मातीची महादेवाची पिंड बसविली व तिची पूजा केली. त्यानंतर दोनच दिवसांनी जोरदार पाऊस आला. पाऊस जोरदार झाल्यामुळे मोर्णा नदीला मोठा पूर आला. या पुराचे पाणी अकोला शहरात शिरले व अनेकांच्या घरातील भांडे वाहून गेले तर काहींच्या घराच्या भिंती पडल्या. या पुराच्या पाण्यामुळे मातीची पिंड वाहून गेली असेल, असे पिंडीची स्थापना करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटले; मात्र मातीची असल्यावरही पिंड जशीच्या तशीच होती. त्यामुळे सर्वांमध्ये धार्मिक भावना निर्माण झाली व दररोज पिंडीची पूजा करण्यात येऊ लागली. या तरूणांनी १०४४ साली शिवभक्त मंडळ स्थापन केले. याचवर्षी श्रावण महिन्यात शिवभक्त मंडळाने स्थापन केलेल्या पिंडीवर मोर्णा नदीचे पाणी आणून जलाभिषेक करीत अन्नधान्य गोळा करून जलाभिषेक केला. अशाप्रकारे कावड महोत्सवास १९४४ साली प्रारंभ झाला. या दरम्यान दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेले पुंडलिकराव शंकरराव वानखडे हे निरंतर दरवर्षी श्रावण महिन्यात भोपळ्याच्या कावडीने पूर्णा नदीचे पाणी आणून शिवलिंगाला जलाभिषेक करीत होते. त्यांना साधुबुवा म्हणत असत. त्यानंतर साधुबुवा यांच्यासोबत अनेक जण जुळत गेले. गांधीग्राम वाघोलीवरून पूर्णा नदीतील पाणी आणून महादेवाला जलाभिषेक करण्यात येत होता. साधुबुवा यांच्यासोबत सुरुवातीला सखाराम वानखडे, कासार, बाबूराव कुंभार, कथले असे अनेक कार्यकर्ते जुळले. त्यांना राजेश्वर मंदिरात चौघडा वाजविणारे गणपतराव श्रावण सदानशिव यांनी सहकार्य केले.
त्यानंतर दरवर्षी गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील पाणी आणून सध्याचे जागृतेश्वर मंदिरातील पिंडीला जलाभिषेक करण्यात येत होता. यावेळी श्रावण महिन्याच्या समाप्तीचा भंडाराही करण्यात येत होता. यादरम्यान देश स्वतंत्र झाला. नबाबपुºयाचे शिवाजी नगर असे नामकरण करण्यात आले. देश स्वतंत्र झाल्यानंतर मोठ्या जोमाने कावड महोत्सव साजरा होऊ लागला. यामध्ये शिवभक्त मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष स्व. मारोतीसा सावजी, स्व. अंबादास सुतवणे, स्व. शंकरराव पारतवार, स्व. नामदेव धनोकार, स्व. परशराम राजूरकर, स्व. मोतीराम गोडसे, स्व. ओंकारसा ताकवाले, स्व. पोचन्ना गंगारे, स्व. महादेव कोल्हे, स्व. गोविंदसिंह ठाकूर, स्व. श्रावण कोल्हे, स्व. हरिभाऊ तिमाजी, स्व. हरिभाऊ सहारे, स्व. रतनसिंह ठाकूर, भिकाभाऊ पहिलवान, स्व. बब्बी पहिलवान, स्व. नारायण बावणे यांच्यासह अनेकांनी या कार्यात सहभाग घेतला. स्व. ब्रम्हानंद बंगारे हे मंडळाचे सचिव होते.
दरवर्षी गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरून पाणी आणून पिंडीला जलाभिषेक करण्यात येत होता. त्यावेळी राजराजेश्वर मंदिरातील ट्रस्टींनी शिवभक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी नगरमध्ये जागृतेश्वर मंदिरासमोर रस्त्यावर होत असलेला अन्नदानाचा कार्यक्रम राज राजेश्वर मंदिरात करण्याची विनंती केली. त्यानंतर राज राजेश्वर मंदिरात अन्नदानाचा कार्यक्रम पार पडत होता. त्यावेळी राज राजेश्वर मंदिर परिसरात बाभळीची झाडे, काटेरी झुडूपे होती. ही झाडे, झुडूपे साफ करून श्रावण महिन्यात महोत्सव साजरा करण्यात येत होता. यावेळी मंदिरात स्व. एकनाथ गुरवे यांचे एकमेव बेल व फुलाचे दुकान होते. त्यानंतर काही वर्षांनी शिवचरण महाराज मंदिरात असलेली लाकडी पालखी घेऊन त्यामध्ये राज राजेश्वराची मातीची मूर्ती तयार करून शहरातून पालखी काढण्यात येत होती. सदर पालखी शिवचरण मंदिरासमोरून विठ्ठल मंदिर, जयहिंद चौक ते राजेश्वर मंदिर व तेथून शिवाजी नगरमधील जागृतेश्वर मंदिरात जात होती. त्यावेळीही भाविक ठिकठिकाणी कमानी उभारून पालखीचे स्वागत करीत होते.
पालखीचा भव्य सोहळा पाहून राज राजेश्वर मंदिरातील ट्रस्टींनी मंडळाला पंचमुखी शंकराची मूर्ती दिली. त्यानंतर श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पंचमुखी मूर्ती गांधीग्रामवरून आणून शहराच्या मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. ही परंपरा तेव्हापासून आजपर्यंत सुरू आहे. सध्या राज राजेश्वर मंदिराचे ट्रस्टी चंद्रकांत सावजी आहेत.
सध्या या उत्सवाने भव्य रूप धारण केले आहे. या उत्सवात संपूर्ण जिल्हाभरातील हजारो कावडधारींचा सहभाग असतो. ढोल- ताशांचा निनाद संपूर्ण आसमंत निनादून सोडतो. हा सोहळा पाहण्याकरिता संपूर्ण शहरातील भाविक गोळा होतात.   

  • कावड महोत्सवात माणकेश्वर मंदिराची पालखी सुरूवातीपासून सहभागी होत असते. ९० वर्षीय नारायणराव लाडुजी गाढे या पालखीत अविरत सेवा देत आहेत.
  • जुने शहरातील शिवचरण पेठ परिसरात महादेवाचे माणकेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे पूजारी नारायणराव लाडूजी गाढे ९० वर्षांचे आहेत. नारायणराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९४४ साली गांधीग्रामवरून पालखी आणली होती. तेव्हापासून तर आजपर्यंत नारायणराव दरवर्षी नियमित पालखीत सहभागी होवून गांधीग्रामवरून अकोला पायी येतात.
  • या वयातही त्यांचा उत्साह व भक्ती ही नव तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. सन १९४४ साली नारायणराव यांनी त्यांचे सहकारी दत्तू जवादे, छगन जोशी, मोतीराम गवात्रे, रामप्रसाद दुबे, तुकाराम गुजर, गोपाल स्वामी यांच्यासह गांधीग्रामवरून पालखी आणण्याला प्रारंभ केला. तेव्हापासून ही पालखी अखंड सुरू आहे.
  • विवेक चांदूरकर

Web Title: Devotional, enthusiasm Kawad Festival: 75 year tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला