बँक्सी - एका भणंग कलावंताची विलक्षण कहाणी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:05 AM2019-10-13T06:05:00+5:302019-10-13T06:05:10+5:30

ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्स सभागृहात  सन्माननीय सदस्यांच्या जागी रांगेत चिम्पाझी बसलेले दाखवणारा बॅँक्सी जगभरात कायमच खळबळ माजवत आला आहे. या बॅँक्सीचा चेहरा जगाने कधी पाहिलेला नाही, कारण तो स्वत:च ‘अदृश्य’ राहिलेला आहे. समकालीन जगाच्या डोळ्यात अंजन घालणारी ग्राफिटी जागतिक महानगरांच्या भिंतींवर चितारून गायब होणारा बॅँक्सी हे या घुसमटल्या काळाचं अपत्य आहे!

Banksy - the subversive and secretive street artist turned the art world upside-down | बँक्सी - एका भणंग कलावंताची विलक्षण कहाणी.

बँक्सी - एका भणंग कलावंताची विलक्षण कहाणी.

Next
ठळक मुद्दे‘जर ट्रेनच्या कंपनीवर तुमची मालकी नसेल, तर जा आणि निदान रंगवा ते ट्रेनचे डबे, तुमच्या कलाकृतीचा शिक्का उमटवा त्यावर !’ - असा पर्याय सुचवणार्‍या एका भणंग कलावंताची विलक्षण कहाणी..

- शर्मिला फडके

बँक्सीचे एक चित्र नुकतेच सथबीच्या लिलावात दहा मिलियन युरो (म्हणजे जवळपास 85 कोटी रुपये) इतक्या रेकॉर्ड ब्रेक किमतीला विकलं गेलं. चित्राचं नाव ‘डिव्हॉल्व्हड पार्लमेंट’! संसदेची अधोगती. ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्स सभागृहात सन्माननीय सदस्यांच्या बसण्याच्या जागांवर रांगेत चिम्पाझी बसले असल्याचं त्यात दाखवलं आहे. खाली लिहिलं आहे- ‘हसा आता- पण एक दिवस यांचंच राज्य येणार आहे!’
 ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन संभाव्य निवडणुकांच्या तयारीत संसदेबाहेर, त्यांच्या वैचारिक विरोधकांना उद्देशून भाषण करण्याच्या तयारीत असताना या चित्राची अशा अवाढव्य रकमेला विक्री होणं ही घटना राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अर्थातच महत्त्वपूर्ण आहे. 
गेल्या वर्षीही याच दिवसांत, ऑक्टोबर 2018 मध्येही बॅँक्सीच्या ‘हातात फुगा धरलेल्या मुली’च्या चित्राने सोशल मीडियावर, कला जगतामध्ये खळबळ माजवली होती. सथबीच्या लिलावात एक मिलियन युरोंना हे चित्र विकलं गेलं. विक्री जाहीर होताक्षणीच चित्राच्या चौकटीत एक अलार्म वाजायला लागला आणि लोकांच्या नजरेसमोर ते चित्र फ्रेममध्ये बसवलेल्या धारदार पात्यांमधून फाडलं जाऊ लागलं. कॅन्व्हासच्या निम्म्याहून जास्त चिंधड्या झाल्यावर ही प्रक्रिया थांबली. बॅँक्सीच्या इन्स्टाग्राम अकाउण्टवरून याचे लाइव्ह चित्रीकरण जगाने पाहिलं. अनेकांनी याला बँक्सीने केलेला स्टंट म्हणून निकालात काढायचा प्रयत्न केला. तसा तो होताही. पण कला-इतिहासातला हा नक्कीच एक महत्त्वाचा स्टंट होता, कारण हे अर्धवट फाडलं गेलेलं चित्र हीच आपली नवीन कलाकृती असल्याचं बॅँक्सीने जाहीर केलं. त्याला नवं नावही मिळालं, ‘कचर्‍यात गेलेले प्रेम’.
कला समीक्षकांच्या मते, बॅँक्सीने कलाकृती नष्ट केली नाही. नव्याने घडवली, तीही लाखो लोकांच्या नजरेसमोर. पिकासोचं एक वाक्य बॅँक्सीने ग्राफिटी म्हणून चित्राच्या मागे चितारलं होतं - ‘उद्ध्वस्त होण्याची आस बाळगणं हे नवनिर्मितीचं लक्षण आहे!’
तसं पाहता बँक्सीच्या आजवरच्या बहुतेक सगळ्याच कलाकृती सार्वजनिक जागी, सार्वजनिक मालमत्तेवरच चितारल्या गेल्या आहेत. बेकायदेशीरपणे, प्रक्षोभित स्वरूपात. लोकांच्या नजरेपासून स्वत:चा खरा चेहरा लपवत त्याने त्या चितारल्या आहेत.
कोण आहे हा बँक्सी? गुगल केलंत तर पहिली काही पानं बॅँक्सीचं खरं नाव काय? तो कुठून आला? त्याच्या कुटुंबीयांचं, बायकोचं नाव काय? बँक्सीने आपली खरी ओळख का लपवली? अशा चौकशांनी भरलेली असतात. अर्थातच या प्रश्नांची खरी उत्तरं ठामपणे कोणाकडेच नाहीत. कारण ती खरी आहेत याचा दुजोरा केवळ बँक्सीच देऊ शकतो आणि तो ते करणार नाही. तसं करायचं तर मुळात त्याने आपली खरी ओळख लपवलीच नसती. बॅँक्सी एक कलाकार आहे आणि त्याने मुखवटा चढवलेला आहे; पण तो दांभिक नाही. बॅँक्सी दांभिक नाही, कारण तो कलाकार आहे आणि त्याच्या कलेतूनच तो दांभिक नसल्याचा शंभर टक्के  खरा पुरावा मिळतो. बँक्सीचा चेहरा लपलेला असला तरी त्याची कला उघड्यावर, खुलेआम असते. रस्त्यावरची कला. तीच त्याची खरीखुरी ओळख. बँक्सीला आपल्या नावा-गावाच्या तपशिलापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाची वाटणारी ओळख. या कलेमुळेच, ही कला प्रामाणिकपणे सादर करता यावी, त्यात कोणताही कणसरपणा येऊ नये, खोटेपणा येऊ नये म्हणून त्याने हा चेहरा लपवणारा मुखवटा चढवला आहे.
आपल्या नावागावाच्या तपशिलांवाचूनचा बँक्सी बराच काही आहे. ग्राफिटी पेंटर तर तो आहेच, शिवाय अन्याय, विषमतेच्या विरोधात चळवळी चालवणारा कार्यकर्ताही आहे. तो शिल्प करतो, सिनेमा बनवतो, एक्झिट थ्रू द गिफ्ट् शॉप या त्याच्या लघुपटाला अकॅडमी अवॉर्डचं नॉमिनेशन मिळालं आहे. पण सर्वात महत्त्वाचं ज्यामुळे त्याला मुखवटा चढवणं भाग पडलं, ते म्हणजे बँक्सी ‘चिथावणीखोर’ आहे.  या सगळ्या कला-माध्यमांमधून तो करत असलेला कलेचा आविष्कार लोकांना चिथावण्याकरता, त्यांच्या भावना भडकवण्याकरता असतो.
बँक्सीने शहरातल्या सार्वजनिक रस्त्यावर चितारलेल्या मजकुरात एवढी प्रक्षोभकता ठासून भरलेली असते की त्याची तुलना शहरावर बॉम्ब पडल्यावर होणार्‍या विध्वंसाशी केली जाते. व्हिएन्नापासून सॅनफ्रान्सिस्को, बार्सिलोनापासून पॅरिस, डेट्रॉइट अशा अनेक शहरांवर बँक्सीने हे बॉम्बिंग आजवर केलं. 
90च्या दशकात ब्रिस्टॉल, इंग्लंडमधल्या भिंतींवर प्रक्षोभक मजकूर चितारणारा एक भणंग कलावंत आज ब्रिटन आणि अमेरिकेच्या ऑक्शन हाउसेसमध्ये लक्षावधी डॉलर्स मिळण्याइतका मोठा कधी, कसा झाला याची कहाणी थरारक आहे. लोकांना ही कहाणी माहीत असल्याने त्यांना या भणंगाचा चेहरा पाहण्यात रस आहे. बँक्सी हे नावही लोकांनीच दिलेलं. त्याने आपला खरा चेहरा दाखवायलाच हवा असा लोकांचा आग्रह फारच वाढला तेव्हा कागदाची पिशवी डोक्यावर बांधून घेतलेला आपला फोटो बँक्सीने प्रसिद्ध केला, बघा मी कसा दिसतो म्हणत- अर्थातच कागदाची ती पिशवी प्लॅस्टिकला विरोध दर्शवत पर्यावरणाचं पुनर्वापर तत्त्व ठसवण्याकरता. 
बँक्सीची ग्राफिटी ही खालच्या वर्गातल्या लोकांनी छुप्या मार्गाने उगवलेला सूड कसा असू शकेल हे दाखवणारी आहे, जवळ काहीच नसलेल्याने सत्ता, प्रदेश आणि प्रसिद्धीवर त्याच्याहून प्रबळ असलेल्यांवर मात करून ताबा कसा मिळवायचा याचं प्रशिक्षण देणारी आहे. त्याच्याच शब्दात सांगायचं तर, ‘जर ट्रेनच्या कंपनीवर तुमची मालकी नसेल, तर जा आणि निदान रंगवा ते ट्रेनचे डबे, तुमच्या कलाकृतीचा शिक्का उमटवा त्यावर!’
- आता ही अशी शिकवण ग्राफिटीमधून देणार्‍याला आपली ओळख लपवणं भाग पडणार नाही तर काय? अर्थात बँक्सीची ग्राफिटी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याकरता नक्कीच नाही. अनेक महत्त्वाचे सामाजिक, राजकीय संकल्पना असलेले विचार त्याच्या ग्राफिटीतून व्यक्त होतात. युद्ध-व्यापारी वृत्ती-फॅसिजम-सरंजामशाही-वर्गभेद-वर्णभेद-अन्याय-निरुद्योगीपणाच्या विरोधात तो भेदक भाष्य करतो. त्याच्या कलाकृतीतल्या व्यक्तिरेखा मानवी वृत्तीतला लोभीपणा, हाव, भोंदूगिरी, फसवेगिरी, लबाडी उघड्यावर आणतात. 
ऐंशीच्या दशकात, ब्रिस्टॉलमधल्या बार्टन हिल या पूर्ण ‘व्हाइट’ गावात कशीबशी 3 ‘ब्लॅक’ कुटुंबं राहात होती- अर्थातच कामगार वर्गातली, हलाखीच्या परिस्थितीतली, मुख्य वस्तीपासून आपसूकच फटकून राहिलेली. बॅँक्सी या तीन कुटुंबांपैकी एकातला. लहान असताना आपल्या वडिलांना होणारी मारहाण त्याने प्रत्यक्ष पाहिलेली, जी तो कधीच विसरू शकला नाही. मनातल्या वेदना, असंतोष, अन्याय होत असल्याची भावना, संताप बाहेर पडत राहिला ग्राफिटीच्या रूपात. चौदा वर्षांच्या असल्यापासून तो ब्रिस्टॉलमधल्या सार्वजनिक जागांवरील भिंती, ट्रेन्सचे डबे, स्टेशन्स, शाळांच्या भिंतींवर ग्राफिटी रंगवायचा. पोलिसांचा ससेमिरा कायमच मागे. त्याकरता शाळेनेही त्याला हाकलून लावलं. अठराव्या वर्षी ट्रेनच्या डब्यात असंच काहीबाही रंगवत असताना पोलीस आले आणि बँक्सी आणि त्याच्या दोस्तांनी पळ काढला. एका कचर्‍याच्या ट्रकच्या मागे तो लपून बसला, डोक्यावर गळक्या इंजिन ऑइलचा अभिषेक होत असताना पोलिसांच्या गस्तीपासून बचावण्याकरता तो तीन तास तिथेच बसून राहिला. ग्राफिटी रंगवणं म्हणजे अर्थातच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, बेकायदेशीर प्रकार. त्यातून मजकूरही समाज-सरकार विरोधातला, प्रक्षोभक. बँक्सीने आपली खरी ओळख दडवणारा मुखवटा चढवला मुळात तुरुंगात रवानगी होण्यापासून स्वत:ला वाचवायला.
बँक्सीच्या चित्रांमधे ठळक उपहास असतो, उपरोध असतो, बोचरा विनोद असतो. माकडं, नाकतोडे, बैल, जंगली जनावरं त्याच्या चित्रांमधल्या माणसांच्या जागा घेतात, त्या प्राण्यांचे स्वभाव माणसाच्या स्वभावाहून कितीतरी उजवे आहेत असंही तो म्हणतो.
बँक्सीने चितारलेली संसदेची अधोगती केवळ त्यात लोकप्रतिनिधींच्या जागी माकडं बसलेली आहेत म्हणून नाही, तर माकडांच्या या रांगा चित्राच्या चौकटीबाहेरच्या, चित्राकडे बघणार्‍या माणसांच्या गर्दीला खिजवून दाखवत हसताहेत, तो उपरोध महत्त्वाचा आहे. या चित्रातला ठळक आणि निर्भीड विचार ब्रिटिशच नाही, तर जगभरातल्या सगळ्याच समकालीन नागरिकांच्या भावना व्यक्त करणारा आहे, त्यातला उपरोध खरा आहे का हे येता काळ ठरवेलच; पण तोवर मुखवटाधारी बँक्सीची चित्रं सार्वजनिक माध्यमांमध्ये, सामान्य नागरिकांमध्ये खळबळ माजवत राहातील हे निश्चित. 
sharmilaphadke@gmail.com
(लेखिका ज्येष्ठ कला समीक्षक आहेत.)

चित्रओळी-
डिव्हॉल्व्हड पार्लमेंट
-‘हसा आता- पण एक दिवस यांचंच राज्य येणार आहे!’
सदबीच्या लिलावात दहा मिलियन यूरो कमावणार्‍या या चित्राने जगभरात मोठी खळबळ माजवलेली आहे. बॅँक्सीने चितारलेली (ब्रिटिश) संसदेची अधोगती केवळ त्यात लोकप्रतिनिधींच्या जागी माकडं बसलेली आहेत म्हणून नाही, तर माकडांच्या या रांगा चित्राच्या चौकटीबाहेरच्या, चित्राकडे बघणार्‍या माणसांच्या गर्दीला खिजवून दाखवत हसताहेत, तो उपरोध महत्त्वाचा आहे. या चित्रातला ठळक आणि निर्भीड विचार ब्रिटिशच नाही, तर जगभरातल्या सगळ्याच समकालीन नागरिकांच्या भावना व्यक्त करणारा आहे, त्यातला उपरोध खरा आहे का हे येता काळ ठरवेलच.

Web Title: Banksy - the subversive and secretive street artist turned the art world upside-down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.