जीव  ओवाळून  टाकणारा  कलावंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:05 AM2019-10-13T06:05:00+5:302019-10-13T06:05:08+5:30

‘‘वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी ज्याचे निधन झाले,  त्या तरुण, प्रतिभावान कलावंताचा म्हणजे  पं. श्रीधर पार्सेकर याचा माझ्या हिशेबी  एकच अर्थ होता - तो म्हणजे व्हायोलिन. पार्सेकर आणि व्हायोलिन हा एक अभेदच होता,  पार्सेकरांचे व्हायोलियन ज्यांनी ऐकलेय, त्यांना हे कळेल.  पार्सेकर व्हायोलिन वाजवत होते की  व्हायोलिन पार्सेकरांकडून वाजवून घेत होते,  हेच कळत नसे; इतके अद्वैत त्या दोघांत होते.’’

An article on Sridhar Parsekar, the finest Hindustani violinist of the 20th century.. on his birth centenary year | जीव  ओवाळून  टाकणारा  कलावंत!

जीव  ओवाळून  टाकणारा  कलावंत!

Next
ठळक मुद्देपं. श्रीधर पार्सेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष 2019-20 या वर्षात पुण्यातील व्हायोलिन अँकॅडमीतर्फे साजरे करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ पुण्यात रविवारी (ता. 13) विजय तेंडुलकर सभागृहात 35 व्हायोलिनवादकांच्या मानवंदनेने होणार आहे. त्यानिमित्त.

- पु.ल. देशपांडे

मी 1936 मध्ये पहिल्यांदा पं. श्रीधर पार्सेकर यांचे व्हायोलिन ऐकले. या गोष्टीला आज बरोबर 50 वर्षे झाली. इस्माईल कॉलेजमध्ये एका रविवारी 4 वाजता त्यांचे व्हायोलिनवादन ठेवले होते. रविवारचा दिवस होता. संध्याकाळी 4 वाजता. आणि तुम्हाला सांगतो, त्यांनी भीमपलासापासून सुरुवात केली. मला अजून या क्षणापर्यंत आठवतंय आणि किती वाजेपर्यंत व्हायोलिन चालले असेल? 4 वाजता सुरू झालेले कॉलेजमधले व्हायोलिन रात्री 10 पर्यंत चालले होते. सहा तास हा मनुष्य वाजवत होता आणि कॉलेजमधली मुलं देहभान हरपून ऐकत होती. वाद्याबद्दल असे सांगतात की, वाद्य गायले पाहिजे आणि गळ्याने वादनाचा साक्षात्कार घडवला पाहिजे, अशी भारतीय संगीताची अट आहे. आपण म्हणतो की साज काय बोलतो?. असेच म्हणतात, साज बोलला पहिजे. व्हायोलिन वाजवताना असे वाटले पाहिजे की हा गातोय आणि गाताना असे वाटले पाहिजे की वीणा चाललेली आहे. म्हणून या देहाला शरीरवीणा असेच म्हटले आहे आपल्या लोकांनी. पार्सेकरांमध्ये तो साक्षात्कार व्हायचा.
‘उपवनी गात कोकिळा’ हे शब्द तुम्हाला कदाचित माहिती नसतील - पण आता ऐकताना मला रसिकराज तीज दिसला मधला स, क, र, सगळे ऐकू येत होते. तुम्हाला सांगतो, म्हणजे तो नुसते स्वर वाजवित नसे, तर त्या जोडीला व्यंजनेसुद्धा वाजवत होता.
- पार्सेकरांच्या दुसर्‍या गोष्टी सांगायच्या म्हणजे, शास्रीय वादनामध्ये त्यांनी लालित्य इतक्या सहज रीतीने आणले की हे शास्रोक्त वादन म्हणजे काही तरी गंभीर असते. चेहरा अत्यंत गंभीर ठेवून ऐकायचे असते आणि तसेच वाजवायचे असते आणि एकूण सगळ्यांनाच बद्धकोष्ठ झालेय अशा प्रकारचे चेहरे करून बसायचे असते, अशा प्रकारची पुष्कळ समजूत होती एकेकाळी वाजवण्यामध्ये. अनेकांनी वाजवलंय. त्यांनी शास्र वाजवलंय, असे ते सांगायचे. शास्र नाही. शास्र इतके अरसिक नाहीये, तुम्हाला सांगतो. रसिकतेने न वाजविता येणार्‍याला आपण शास्रोक्त वाजवतो, असे म्हणतो. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही ज्या वेळेला होतो, त्या वेळेला बोलताना असे म्हणत होतो. गाणे बेचव झाले की म्हणत होतो - पण ज्ञान काय आहे, असे म्हणायचो. ज्ञान काय आहे, असे म्हटले की त्या गाण्याला परत जायचे नाही, असे आमचे मित्र लक्षातच ठेवत असत. परंतु ज्यांना त्यातले ज्ञान काहीही नव्हते, त्या बालगंधर्वांनी एक नुसता गंधार- मध्यम लावला की जीव ओवाळून टाकावा, असे वाटत होते. असा जीव ओवाळून टाकणारा कलावंत जर तंतुवाद्यात कोण झाला असेल, तर माझ्या माहितीत र्शीधर पार्सेकर हा झाला. बालगंधर्वांचे आमच्या मनामध्ये जे स्थान आहे, तेच वादकांच्यामधे पार्सेकरांचे आमच्या मनामध्ये स्थान आहे. ते कोणालाही हलवायची प्राज्ञा नाही.
मी अनेकवेळा पार्सेकरांचे वादन ऐकलेय. जितका त्यांचा व्हायोलिनवर हात साफ होता, तितकाच त्यांचा पेटीवरतीसुद्धा हात साफ होता. गोविंदराव टेंब्यांच्या हाताची जी सफाई होती, ती पार्सेकरांच्या बोटांमध्ये होती, हे मी तुम्हाला सांगतो. मीही पेटीशी धडपड केलेला मनुष्य आहे. अप्रतिम स्वच्छ वाजवणे; इतकेच नव्हे, तर तबलासुद्धा इतका छान वाजवत होते.. 
एका मैफलीची कथा आहे. एका मैफलीत त्यांच्याबरोबर एक नामवंत तबलजी बसले होते. पार्सेकर हा तालाचा बादशहाच होता. एक तर गोमंतकाला तालज्ञ असण्याचे वरदानच आहे. गोमंतकातला गवई म्हटला की तो तालामधला बादशहाच असायचा. कोणी असो स्री असो, पुरुष असो, कुणीही असो. ज्योत्स्नाबाई गायला बसल्यानंतर तिरखवाँ साथीला बसलेत की आणखी कोण बसलेत याची त्यांना चिंताच करायचे कारण नाही. कारण तालाचे वरदान घेऊनच आलेले ते लोक आहेत. र्शीधर पार्सेकर इतका तालामध्ये तयार असताना तो तबलजी अंटसंट वाजवायला लागला. मी त्या तबलजीला चूक म्हणणार नाही. पार्सेकर वाजवताना इतक्या लयीच्या गमती करायचे, की त्या तबलजीच्या बोटाला खाज सुटली, तर त्याच्यात मला त्याचे काही चुकले, असे वाटत नाही. पण थोडा बेरंग व्हायला लागला आणि पार्सेकर त्याला काय म्हणाले, ‘थोडा वेळ ठेका धरा.’ तर, ते म्हणाले - ‘मग तुम्हीच तबला वाजवा !’ 
- मैफलीत हं ! मैफलीत काय अचरटासारखे वागण्याचे प्रकार पुष्कळ वेळा होतात. मैफलीतच जास्त होतात असे म्हणू या. अहंकार लगेच दुखावले जातात ना? तर, त्यांनी तो तबला. तुम्हीच वाजवा, असे म्हटल्यावर पार्सेकरांनी तो तबला घेतला आणि अर्धा तास गत तोडा वाजवला. नंतर आपले व्हायोलिन तबलजीजवळ दिले आणि म्हणाले, आता तू हे दोन मिनिटे वाजवून दाखव. त्यानंतर तो तबलजी पुन्हा मैफलीत वाजवायला गेला की नाही ते मला माहिती नाही. पार्सेकरांच्या नक्कीच गेला नसेल. पण खरा कलावंत असेल, तर पार्सेकरांच्याच मैफलीला गेला असेल. कारण ताल म्हणजे काय, कसा मुरलाय, हे त्यांनी आपल्या हातांनी त्याला तिथे दाखवून दिले होते.
मी एक साधी गोष्ट सांगतो. ‘कुबेर’ पिरची त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. तर, पिर चालू असताना त्याच्यामधे रेकॉर्डिंग सुरू होते. गाण्याचे, एका ऑपेरासारख्या गाण्याचे. त्यामध्ये नगारा वाजवायचा होता. तर, इथले नगारा वाजविणारे गृहस्थ आणलेले होते वाजवायला. ते लग्नात वाजविणारे असावेत. त्यांना त्या नगार्‍यातले जमत नव्हते वाजवायला. तर, पार्सेकर म्हणाले, ‘अहो, असं नाही, जरासा असा-असा तुकडा पाहिजे.’ माझ्यासमोर झालेली गोष्ट आहे, म्हणून मला आठवतंय. ते पार्सेकरांना म्हणाले, ‘कसा पाहिजे तो तुम्ही मला दाखवा.’
त्याला काय वाटलं, की हा काय म्युझिक डायरेक्टर, हात-बित असं करणारा. पार्सेकर जे तिथे बसले आणि तुम्हाला सांगतो, त्यांनी जो नगारा वाजवून दाखवला त्याला. नगार्‍यावरतीसुद्धा इतका सुंदर हात जात होता. नगारासुद्धा तबल्यासारखा रेला-बिला फेकून वाजवता येतो तसा त्यांनी वाजवला. आम्ही सांगितले, ‘पार्सेकर, रेकॉडिर्ंग पंधरा मिनिटं थांबवा, तुम्ही नगारा वाजवा.’ 
तेव्हा मला अहंकार आहे, की पार्सेकरांचे व्हायोलिन पुष्कळांनी ऐकले असेल; पण मी त्यांचा नगारा ऐकलेला मनुष्य आहे. इतका मोहक स्वभावाचा मनुष्य होता तो, तुम्हाला काय सांगू? अतिशय चांगला. जितके त्याचे व्हायोलिन चांगले, तितकेच त्याचे वागणे, बोलणे, वावरणे हेही तितकेच चांगले. बसला वाजवायला म्हणजे वाजवणार्‍याकडे पाहत राहावे असे वाटायचे, ऐकत राहावे वाटण्याइतकेच. 
नाही तर काही काही वेळेला लोक वाजविणारे बसलेले असतात त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहिल्यावर म्हणजे नको असे वाटायला लागते. च्या च्या च्या च्या करून आणि आपला गज हा एक प्रकारची करवत आहे - आणि कचाकचा कचा करून आपण सुरांना कापत सुटलेलो आहोत, अशा प्रकारे प नी नी नी, प सा सां सां, परें रें रें, प ध ध ध असे जे चाललेले असते, अशा प्रकारचे करवतकाम पार्सेकरांनी कधीच केले नाही.  
देवासचे रजबअली खाँसाहेब म्हणजे जुन्या जमान्यातला किती खंदा मनुष्य ! कुठल्या भलत्या काँप्रोमाइझला अजिबात तयार नसलेले आणि अतिशय भांडखोर म्हणूनसुद्धा त्या काळात प्रसिद्ध. त्याला हवे तर वादविवाद म्हणा. त्यांच्याबरोबर पार्सेकर बसायचा अन् त्यांची जबड्याची तान म्हणजे इतकी वेडीवाकडी, इतकी तयार होती; ती प्रसिद्ध तान होती त्यांची. इतकी झपाट्याने जायची.. एका क्षणामध्ये वरच्या गंधारावरून षड्जाला कधी आली कळतसुद्धा नसे, असे गाणारे. ते तिथे जाऊन आले, तर दुसर्‍या क्षणी ती तान तशीच निघालीय, असे लोकांना वाटायचे, ती ह्यांच्या व्हायोलिनमधून निघालेली असायची. हे मला आजसुद्धा आठवते.
मी कागलकरबुवांच्या वेळच्या तानांबरोबर ऐकलेले आहे. त्याबरोबर हिराबाईंसारखे संथ, शांत गाणारे त्या वेळेला होते; तसेही ऐकलेले आहे. साथीच्या माणसाने एकरूप व्हायचे असते, त्याच्यापुढे जाऊन आपली हुशारी दाखवायची नसते, हे त्यांनी इतके जाणलले होते की त्यांना गाता-गाता त्यांची एक जागा गेल्यानंतर - अरे, ही जागा अशी जायला पाहिजे, असे दाखविण्याचा मोह किती वेळा झाला असेल, तो आवरून त्यांनी साथ केली. म्हणजे हा कलावंत सर्व दृष्टीने होता. तो कम्पोझर उत्तम होता, उत्तमवादक होता; या सगळ्यापेक्षासुद्धा संगीताचं र्मम कशामध्ये आहे, हे पार्सेकरांना बरोबर कळलेले होते. आणि ते र्मम अशा अशामध्ये आहे, हे तुम्हाला आपल्या व्हायोलिनवादनाने तो दाखवून देऊ शकत होता. हा त्याच्यामधला मोठेपणा होता. इतका हा मोठा कलावंत.
(पुण्याच्या उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयातर्फे प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. श्रीधर पार्सेकर यांचे छायाचित्र पुणे आकाशवाणीला अर्पण करण्याचा सोहळा झाला. त्यात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी पं. पार्सेकर यांना आपल्या भाषणातून आदरांजली वाहिली होती. पार्सेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यातील काही अंश पुर्नप्रसिद्ध करत आहोत.)

Web Title: An article on Sridhar Parsekar, the finest Hindustani violinist of the 20th century.. on his birth centenary year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.