‘भाजपात राहून शिंदेंशी लढता येणार नाही, स्वगृही परत या’, गणेश नाईकांना संजय राऊतांची खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:41 IST2026-02-16T12:18:50+5:302026-02-16T12:41:22+5:30
Sanjay Raut’s Offer To Ganesh Naik: उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे.

‘भाजपात राहून शिंदेंशी लढता येणार नाही, स्वगृही परत या’, गणेश नाईकांना संजय राऊतांची खुली ऑफर
राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरावरील वर्चस्वावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून सातत्यांने एकमेकांना आव्हान आणि प्रतिआव्हान दिले जात आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे.
महानगरपालिका निवडणुकीदरम्यान नवी मुंबईत पेटलेला नाईक आणि शिंदेंमधील संघर्ष गेल्या काही दिवसांत पुन्हा उफाळून आला आहे. यादरम्यान, माझ्या नादाला लागलात तर माजी खासदार करून टाकेन, असा इशारा गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांना दिला होता. त्यानंतर एवढीच खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीत आमच्याविरोधात लढा, असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिलं होतं.
या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांना उद्धवसेनेत प्रवेशाची ऑफर देताना संजय राऊत म्हणाले की, हा भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एक दिवस एकनाथ शिंदे यांना तुरुंगात जावं लागेल, असे गणेश नाईक म्हणत आहेत. मात्र त्यांना पाठबळ मिळत आहे का? तर नाही. गणेश नाईक यांना ही लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. पाठबळ असेल तर कारवाई व्हायला हवी.
संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधील एका मंत्र्यावर पोरकटासारखे हल्ले करताहेत. ते पाहता माझं गणेश नाईक यांना आवाहन आहे की, तुम्हाला ही लढाई भाजपामध्ये राहून कधीच लढता येणार नाही. तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलं आहे. तुम्ही स्वगृही आलं पाहिजे. तुम्ही शिवसेनेच्या मूळ प्रवाहात आलं पाहिजे आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी यावेळी दिली.