बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव समोर आले आहे. कराड हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जातात, यामुळे मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता मंत्रिपद जाऊनही त्यांनी अजून 'सातपुडा' हा सरकारी बंगला सोडलेला नाही. या प्रकरणी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, छगन भुजबळ यांना अजूनही सरकारी बंगला मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याच सातपुडा बंगल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ हे वास्तव्यास येणार आहेत. पण, मुंडे यांनी हे निवासस्थान सोडले नसल्यामुळे ते या बंगल्यात राहण्यासाठी येऊ शकलेले नाहीत.
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
४२ लाख रुपये दंड
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चार महिने पूर्ण झाली आहेत. पण. अजूनही बंगला सोडलेला नाही. ४ मार्च रोजी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर पुढील चार दिवसात शासकीय निवासस्थान सोडणे अपेक्षित होते. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री पद हे छगन भुजबळांना मिळाले आणि 23 मेला सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेश निघाला. पण सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, मुंडेंनी हा बंगला सोडला नसल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम ४२ लाख रुपये असल्याची चर्चा सुरु आहे.
धनंजय मुंडेंनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. "माझ्या आजारपणावर उपचारासाठी मुंबईत रहावे लागत असल्याने आणि लहान मुलीच्या एॅडमिशनचा प्रश्न असल्याने वेळ लागत आहे. मुदतवाढीसाठी सरकारकडे विनंती केली आहे. याआधीही हजारोवेळा अनेक मंत्र्यांना पद नसताना अशा प्रकारे मुदतवाढ दिलेली आहे",असंही मुंडे म्हणाले.
अंजली दमानियांनी केले आरोप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आरोप केले आहेत." चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. आज चार ऑगस्ट आहे. म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाही, त्यावर त्यांचं म्हणणं मुलीच्या शाळेमुळे आणि माझ्या आजारपणामुळे मला मुंबईत राहण गरजेचं आहे असं आहे. तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस दोन बेडरुमचे घर विकत नाहीतर भाड्याने घेऊन राहिला असता. पण शासकीय बंगला न सोडणे हे चुकीचे आहे, त्यांच्यावर आता ४२ नाही तर ४६ लाखांचा दंड बसतो. त्यांना हा दंड माफ केला नाही पाहिजे, त्यांच्याकडून हा दंड वसूल केला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.