समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?; चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:10 IST2025-10-08T14:10:06+5:302025-10-08T14:10:52+5:30
गुन्हेगारी विश्वास पोलिसांवर दबाव टाकून गुन्हेगारांना कशी मदत करता येईल हे काम समीर पाटील करतो असा आरोप त्यांनी केला.

समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?; चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
पुणे - शहरातील गुन्हेगारी विश्वास कुप्रसिद्ध असलेला गुंड निलेश घायवाळ याला पासपोर्ट मिळाल्याने तो देश सोडून पळून गेला. या मुद्द्यावरून शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात येत आहेत. समीर पाटील उर्फ मिनी चंद्रकांतदादा म्हणत धंगेकरांनी एक फोटो ट्विट केला आहे. गुन्हेगारी, दहशत, कोयता गँग, अवैध धंदे, बिझनेस डिल्स आणि समीर पाटील आणि आदरणीय चंद्रकांतदादा हे सगळं एकत्र समीकरण आहे असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर म्हणाले की, निलेश घायवाळ पासपोर्ट मिळाल्यानंतर देश सोडून पळाला ही प्रचंड गंभीर बाब आहे. हा पासपोर्ट कुणी दिला त्या अधिकाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे. त्या अधिकाऱ्याला कुणी फोन केला, पाठिंबा दिला हेदेखील शोधले पाहिजे. कोथरूडमध्ये निलेश घायवाळची दादागिरी कित्येक वर्ष सुरू आहे. गुन्हेगाराला जातपात, पक्ष नसतो. सत्ता असेल तो पक्ष..चंद्रकांत पाटील हे सत्तेत असताना कोथरूडमध्ये गुन्हेगारी फोफावते कशी हा सोपा प्रश्न आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधील समीर पाटील ही सगळी कामे करतो. गुन्हेगारी विश्वास पोलिसांवर दबाव टाकून गुन्हेगारांना कशी मदत करता येईल हे काम समीर पाटील करतो असा आरोप त्यांनी केला.
तसेच माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असं समीर पाटील म्हणाले, मी १०० कोटींचा मालक आहे असा दावा त्यांनी केला. त्यानंतर समीर पाटील कोण हे तपासले असता. समीर पाटील चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असणारे फोटो दिसले. १०० कोटींचा मालक असेल आणि राजकारणाचा काही संबंध नसेल तर हा तिथे काय करतो? मी समीर पाटीलचे फोटो ट्विट केलेत. समीर पाटीलला पहिला मोक्का लागला होता. २० वर्षापूर्वी पुण्यात आलेला समीर पाटील १०० कोटींचा मालक कसा झाला? चंद्रकांत पाटील कदाचित आत्मचिंतन करत असतील त्यामुळे या प्रकरणावर बोलत नसतील. संशयाची सुई त्यांच्यावर आहे त्यांनी बोललं पाहिजे अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.
दरम्यान, १०० कोटी कसे कमावले, चंद्रकांत पाटील यांच्याकडे बेरोजगार युवकांना पाठवले पाहिजे. १०० कोटी कसे कमवायचे हे कळेल. चंद्रकांत पाटलांचा मानस पुत्र असल्यासारखे फोटो समीर पाटील लावतो. समीर पाटलांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे म्हणजे मला अजून माहिती मिळेल. घायवाळ टोळी संपवली पाहिजे. पोलिसांनी फडकं टाकून गोळ्या पुसल्या पाहिजेत. समीर पाटील आणि निलेश घायवाळचे अनेक फोटो आहे. लोकशाहीत तुम्ही केलेले पाप कधीतरी उघड होते. जे राजकारण सुरू आहे ते थांबवले पाहिजे. समीर पाटील यांच्या व्यवहाराची चौकशी केली सर्व धागेदोरे उघड होतील असं धंगेकर यांनी म्हटलं.