कृषी विमा योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कधी कारवाई, अधिवेशनात सतेज पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:54 IST2025-07-02T15:52:56+5:302025-07-02T15:54:01+5:30
महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

कृषी विमा योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कधी कारवाई, अधिवेशनात सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या एक रुपयात विमा या योजनेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. यामध्ये गुंतलेल्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी अधिवेशनात उपस्थित केला. यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोषींवर एक महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
सतेज पाटील म्हणाले, नवीन पीक योजनेच्या माध्यमातून सरकार ५ वर्षात २५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणार असल्याचा दावा करत आहे. मात्र, यासाठी काही टाइमलाइन आहे? ते पैसे किती दिवसात आपण शेतकऱ्यांना देणार आहात? यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी या नवीन पीक योजनेमुळे सरकारचे साडेपाच हजार कोटी रुपये वाचले आहेत. तेच पैसे शेतकऱ्याच्या भांडवली गुंतवणुकीला वापरणार असल्याचा खुलासा केला.
पंचनामा झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याचा मोबदला मिळेल, असेही त्यांनी सांगितले. विमा कंपन्यांच्या बाबतीत जर कोणी तक्रार केली आणि त्यात विमा कंपनी दोषी सापडली तर त्यांच्यावर महिन्याच्या आत कारवाई करण्यात येईल, असा शब्दही त्यांनी दिला.