केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? कोणत्या क्षेत्रात झाली भरीव तरतूद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 17:09 IST2025-02-01T17:09:08+5:302025-02-01T17:09:33+5:30

What Mumbai Maharashtra Gets From Union Budget 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

what did mumbai and maharashtra get from the union budget 2025 | केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? कोणत्या क्षेत्रात झाली भरीव तरतूद?

केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? कोणत्या क्षेत्रात झाली भरीव तरतूद?

What Mumbai Maharashtra Gets From Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सुमारे १ तास १४ मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पी भाषणामध्ये, युवा, शेतकरी, महिला, सेवाक्षेत्र, रोजगार, कर्ज आणि विशेष पॅकेज यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एनडीएकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले, याबाबत काही माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे. महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये ५ लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देणे, आयआयटीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल. ऑनलाईन गिग वर्कर्ससाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्त्वाचा असून सुमारे १ कोटी गिगवर्कर्सना पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. हे सर्व निर्णय विद्यार्थी, युवक, समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आले आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? 

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख, मुंबई मेट्रोसाठी १६७३ कोटी ४१ लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळ सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी  ५९६ कोटी ५७ लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी १८६ कोटी ४४ लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी ६५२ कोटी ५२ लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी १०९४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. महायुतीच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत आनंद व्यक्त केला असून, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मात्र यावर सडकून टीका केली आहे.

 

Web Title: what did mumbai and maharashtra get from the union budget 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.