शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:25 IST2025-10-31T11:25:27+5:302025-10-31T11:25:55+5:30
Sharad Pawar, NCP Meeting: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी शरद पवारांच्या मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा गंभीर आरोप. फोटो समोर आल्याने मोठी खळबळ.

शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून बैठका, मोर्चेबांधणी सुरु आहे. यानिमित्ताने सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाने शरद पवारांच्या उपस्थितीत विविध जिल्हा, शहरांच्या नेत्यांना बैठकीला बोलविले होते. या बैठकीत सोलापूर शहरअध्यक्षांनी मुंबईतील आपल्या ओळखीच्या असलेल्या भाजप कार्यकर्त्याला पाठविल्याचे आरोप केले जात आहेत.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे बैठकीला न जाता भाजपाच्या एका कार्यकर्त्याला बैठकीला पाठवल्याचा आरोप सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचे खरटमल यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी बैठकीला गेलेल्या व्यक्तीचे भाजपाच्या बैठकीतले, नेत्यांसोबतचे फोटोच प्रसिद्ध करून धुरळा उडवून दिला आहे.
मुंबईतील बैठकीत सोलापूर शहरातून भारत जाधव, यु. एन बेरिया यांच्यासह महेश गाडेकर उपस्थित होते. सुधीर खरटमल यांनी जाणे अपेक्षित होते. परंतू, आपले तिकीट कन्फर्म न झाल्याने बैठकीला जाऊ शकलो नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. खरटमलांनी स्वत:ऐवजी मुंबईत असलेल्या महेश गाडेकर याला पाठविल्याचे समजताच प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी खरटमल यांना भेटून जाब विचारल्याचा प्रकार घडला आहे.
मी मिटिंगला जाणार होतो. मात्र माझे तिकीट कन्फर्म झाले नसल्याने मी गेलो नाही. मुंबईत माझे मित्र महेश गाडेकर यांना मी मिटिंगला पाठवून आढावा घेण्यासाठी पाठवले होते, अशी माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली आहे.