विरारच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: March 11, 2015 02:18 IST2015-03-11T02:18:58+5:302015-03-11T02:18:58+5:30

सोमवार, ९ मार्च रोजी अलिबागच्या ५६वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विरारच्या एका गर्भवती महिलेचा स्वाइन

Virar's pregnant woman dies | विरारच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

विरारच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

मुंबई : सोमवार, ९ मार्च रोजी अलिबागच्या ५६वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विरारच्या एका गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. मुंबईबाहेरून उपचारासाठी आलेल्या दोन महिला रुग्णांचा दोन दिवसांत मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १५ इतकी झाली आहे. मंगळवार, १० मार्च रोजी स्वाइनचे नवे ६९ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये २४ मुलांचा समावेश आहे.
विरार येथे राहणाऱ्या ७ महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेला २६ फेब्रुवारी रोजी परेलच्या वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांनी या महिलेची प्रकृती खालावल्यानंतर सोमवार, २ मार्च रोजी तिला उपचारासाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. या महिलेचा रविवार, ८ मार्च रोजी मृत्यू झाला.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात स्वाइनच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात रोडावली होती. पहिल्या काही दिवसांत २० ते ४० रुग्ण आढळत होते. गेल्या तीन दिवसांत रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढून ४७ ते ५२ वर पोहोचली होती. पण, मंगळवारी सोमवारच्या तुलनेत २२ रुग्ण जास्त आढळून आले आहेत. मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ३४ पुरुष तर ३५ महिलांचा समावेश आहे. उपचारासाठी २४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ४५ रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Virar's pregnant woman dies