vinayak mete reaction on leader of opposion in legislative council | विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर माझाच अधिकार: विनायक मेटे
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर माझाच अधिकार: विनायक मेटे

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या पदासाठी विनायक मेटे यांच्यासह सुरेश धस आणि पंकजा मुंडे हे नेतेही स्पर्धेत असल्याचं बोललं जात आहे. मात्र असे असले तरीही, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर माझाच अधिकार असल्याचा दावा विधानपरिषदेचे आमदार आणि शिव संग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळवून सुद्धा महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. परळीमधून पराभव झाल्यांनतर राज्याच्या राजकारण पुन्हा सक्रीय होण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आता मेटे यांनी दावा केला आहे. भाजपमधील घटकपक्ष आणि भाजपा आमदार यात सर्वात जेष्ठ मीच आहे. अनुभवी मीच आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर सुद्धा माझाच अधिकार आहे असा दावा विनायक मेटे यांनी केला आहे. मात्र असं असलं तरीही विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचा याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असंही मेटे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात घडलेल्या घडामोडींनंतर आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहोत. यासाठी शिवसंग्रामच्या आमदारांना घेवून मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. तसंच आम्ही सर्व चवदार तळ्यावर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेवून संघर्षाला सुरुवात करणार आहोत, असं विनायक मेटे यांनी सांगितलं आहे.

Web Title: vinayak mete reaction on leader of opposion in legislative council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.