"मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, न्यायालयात न टिकणारे आरक्षण"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 02:07 PM2024-02-21T14:07:18+5:302024-02-21T14:09:17+5:30

फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Vijay Wadettiwar reaction over maratha reservation | "मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, न्यायालयात न टिकणारे आरक्षण"

"मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, न्यायालयात न टिकणारे आरक्षण"

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारं नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे.  महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले आहे. दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. तेलही नाही आणि तुपही नाही आमच्या मराठा समाज बांधवांच्या हाती या महायुती सरकारने फक्त धुपाटणे दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची आणि माझी भूमीका मी वेळोवेळी मांडली आहे. आज दिलेले 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. या महायुती सरकारमुळे मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास होणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महायुतीचं सरकार बळीराजाची फसगत करणारं फसवं सरकार आहे. बेरोजगार युवक-युवतींची फसगत करणारं फसवं सरकार आहे. परीक्षार्थी उमेदवारांची फसगत करणारं फसवं सरकार आहे. जुमलेबाजी करणारं जुमलेबाज सरकार आहे. मलिदा खाणारं फसवं सरकार आहे. गॅरेंटीच्या नावाखाली फसगत करणार नो गॅरेंटी सरकार आहे. आता आरक्षण प्रश्नी फसगत करणारं फसवं सरकार म्हणून नवी ओळख या सरकारला मिळाली आहे अशा शब्दात वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे.
 

Web Title: Vijay Wadettiwar reaction over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.