प्रादेशिक, राष्ट्रीय पक्षांना संपवण्याचा भाजपचा विडा; संविधान सन्मान महासभेत ॲड. आंबेडकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:01 IST2025-11-26T11:01:23+5:302025-11-26T11:01:57+5:30
भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले.

प्रादेशिक, राष्ट्रीय पक्षांना संपवण्याचा भाजपचा विडा; संविधान सन्मान महासभेत ॲड. आंबेडकरांची टीका
मुंबई - देशात एकीकडे जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. तर, दुसरीकडे प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांना संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे. तसे झाल्यास त्यांना खुले मैदान मिळेल. त्यामुळे विरोधी पक्षांची भूमिका आता वंचितांच्या खांद्यावर आली आहे. जे संविधानाला मानणारे राष्ट्रवादी, तर मनुवादाला मानणारे विघटकवादी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथील संविधान सन्मान महासभेत केली. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर भाजपला मत देणार नाही हा निर्धार करा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा. देशात विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळेच भाजप नकली प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष मजबूत असता तर असली प्रश्नांना हात घालता आला असता. पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताची ७ विमाने पाडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रम्प सांगतात, पण विरोधी पक्ष काहीच कसा विचारत नाही, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरतात. इतर देशांतील भारतीयांच्या सभा घेतात. अमेरिकेने एच१ व्हिसा बंद केला. कारण बाहेरचे लोक वाढले तर राज्य करतील ही भीती त्यांना आहे. मोदींनी भारताला नुकसान पोहोचवले आहे, पण इतर देशांतील भारतीयांची त्या त्या देशातून हकालपट्टी करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे, असाही आरोप त्यांनी केला. या देशातील प्रजा कशी असावी, हे ठरविण्याची वेळ मतदारांवर आली आहे. पैशांसाठी विकले जाऊ नका, असेही आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचितचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर, युवा अध्यक्ष सुजात आंबेडकर, भारतीय बौद्ध समाजाचे एस. पी. भंडारी, जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी, विजयाबाई सूर्यवंशी (सोमनाथ सूर्यवंशी यांची आई), भन्ते राजज्योती (बुलडाणा), मौलाना डॉ. अब्दुर रशीद मदणी, ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर बंडगर महाराज, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आरएसएस नोंदणी का करत नाही?
सर्वच राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांना संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना जमाखर्च दिला जातो. मात्र, आमची संघटना ब्रिटिशांच्या काळातील आहे त्यामुळे नोंदणीचा प्रश्न येत नाही, हे आरएसएसचे उत्तर कायद्याचे पालन न करण्यासारखे आहे. याबाबत औरंगाबादला न्यायालयात खटला दाखल केला असून जोपर्यंत आरएसएसची नोंदणी होत नाही, तोपर्यंत टोकाचे भांडण सुरू राहील. ज्यावेळी नोंदणी होईल, त्यावेळी आमचे भांडण संपले, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.