समृद्धीवरील बेशिस्त वाहनचालकांवर पुढील महिन्यापासून बसणार वचक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 07:53 IST2026-05-18T07:53:24+5:302026-05-18T07:53:38+5:30

अनिलकुमार गायकवाड : महिनाभरात होणार आयटीएमएस प्रणालीचा पहिला टप्पा कार्यान्वित 

Unruly drivers on Samruddhi will be subject to scrutiny from next month! | समृद्धीवरील बेशिस्त वाहनचालकांवर पुढील महिन्यापासून बसणार वचक !

समृद्धीवरील बेशिस्त वाहनचालकांवर पुढील महिन्यापासून बसणार वचक !

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर नियमभंगांमुळे होणारे अपघात रोखणे आता शक्य होणार असून, बेशिस्त वाहन चालकांवर पुढील महिन्यापासून वचक बसेल. या मार्गावर बसविण्यात आलेली इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) पुढील महिन्यापासून कार्यान्वित होत असून, पहिल्या टप्प्यात नागपूर ते जालनादरम्यानच्या ३६४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही सेवा सुरू केली जात आहे. त्याद्वारे वाहनचालकांकडून होणाऱ्या १६ प्रकारच्या नियमभंगांवर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्गावर आयटीएमएस यंत्रणा ऑगस्टमध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. 

अनिलकुमार गायकवाड यांनी नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देत ‘लोकमत कॉफी टेबल’ उपक्रमांतर्गत संपादकीय विभागाशी विविध मुद्यांवर मनमोकळा संवाद साधला. प्रारंभी मुंबई ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी त्यांना लंडन इकॉनोमिक कन्व्हेन्शनचे बुक भेट दिले.
एमएसआरडीसीकडून नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर अंतराच्या मार्गावर १,६९८ कोटी रुपये खर्चून इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम (आयटीएस) बसविण्यात येत आहे. त्यासाठी एनसीसी लिमिटेड आणि ॲमनेक्स इन्फोटेक्नॉलॉजीस यांना जुलै २०२४ मध्ये कंत्राट देण्यात आले होते. 

आयटीएमएस

वैशिष्ट्ये :  प्रत्येक १ किमी अंतरावर उच्चक्षमतेचे सीसीटीव्ही.
आमने येथे इंटीग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सेंटर, तर सात ठिकाणी रिजनल ट्रॅफिक मॅनेजमेंट केंद्र.
महामार्गावर एकूण २९४ ग्रँन्ट्री. त्यावर व्हीएएसडी ७० आणि व्हीआयडीईएस १४० यंत्रणा तसेच एलसीएस १२ आणि व्हीएमएस ७२ यंत्रणा.
महामार्गावर प्रत्येक २ किमीवर मदतीसाठी अत्यावश्यक 
कॉल बुथ.
दुर्घटनेवेळी संवादासाठी वायरलेस पद्धतीची मोबाइल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम.

फायदे : १६ प्रकारचे नियमभंग कॅमेऱ्यांच्या नजरेत.
चोवीस तास देखरेखीमुळे सुरक्षा होईल आणि गुन्हे पकडता येणार.
रस्ते सुरक्षेत वाढ होऊन अपघात रोखता येणार.
रिअल टाइम मॉनिटरिंगद्वारे अपघात रोखणे शक्य होणार.

कोणते नियमभंग केल्यावर कारवाई?
ओव्हरस्पीडिंग, विरुद्ध दिशेने येणे, गाडी चालविताना मोबाइल वापरणे, सीट बेल्ट न लावणे, फॅन्सी नंबर, महामार्गावर दुचाकी घेऊन जाणे, नो-पार्किंगमध्ये गाड्या लावणे, लेनची शिस्त न पाळणे, बोगद्यात चुकीच्या दिशेने गाडी चालविणे, त्यात हेडलाइट न लावणे, रिफ्लेक्टरचा वापर टाळणे, गाड्या ओव्हरलोड असणे आदी.

नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
या मार्गावर प्रतितास 
१५० किलोमीटर वेगाने वाहने प्रवास करू शकतील अशारीतीने त्याची 
बांधणी करण्यात आली आहे. मात्र सद्य:स्थितीत या मार्गावर प्रतितास 
१२० किलोमीटरची वेगमर्यादा आहे. 
मात्र त्याहून अधिक वेगाने वाहने 
जाताना दिसतात. 
तसेच महामार्गावर लेनची शिस्त पाळली जात नाही. त्यातून गंभीर अपघाताचे प्रकार घडले आहेत. बेशिस्त वाहने चालविणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आणि महामार्गावरील अपघातादरम्यान तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी विशेष अशी आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात 
येत आहे.

आता ‘मिशन वांद्रे-वर्सोवा लिंक’ प्रकल्प
समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंक, ठाणे क्रिक ब्रिज हे महत्त्वाचे प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल केले आहेत. आता वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, २०२८ च्या सुरुवातीला या प्रकल्पाचा वांद्रे ते कार्टर रोडपर्यंतचा टप्पा पूर्ण करण्यावर भर आहे. या प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.
सी लिंक प्रकल्पात रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी कंत्राटदार होती. मात्र, त्यांनी प्रकल्पाचे काम केले नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा कंत्राटदार बदलावा लागला. त्यातच मच्छीमार बांधवांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करावे लागले, तसेच समुद्रात १५ मेनंतर काम करता येत नाही. आता मान्सूनचे चक्र बदलले असून, लांबलेल्या मान्सूनमुळे प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर उजाडतो. त्यामुळे प्रकल्पाच्या कामासाठी ६ महिनेच मिळतात. त्यामुळेही प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला असून, या सर्व अडचणींवर मात करीत प्रकल्पाच्या कामांना गती दिली आहे, असेही गायकवाड म्हणाले.

Web Title : समृद्धि राजमार्ग पर लापरवाह चालकों पर अगले महीने से शिकंजा!

Web Summary : समृद्धि महामार्ग अगले महीने से इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम (आईटीएमएस) लागू करेगा, जिसकी शुरुआत नागपुर-जालना खंड से होगी। इस प्रणाली का उद्देश्य 16 प्रकार के यातायात उल्लंघनों को दंडित करके दुर्घटनाओं को रोकना, सुरक्षा बढ़ाना और राजमार्ग पर दुर्घटनाओं को कम करना है।

Web Title : Samruddhi Highway to crack down on reckless drivers next month!

Web Summary : Samruddhi Mahamarg will implement an Intelligent Traffic Management System (ITMS) next month, starting with the Nagpur-Jalna stretch. This system aims to curb accidents by penalizing 16 types of traffic violations, enhancing safety and reducing mishaps on the highway.