Uddhav Thackeray Delhi Tour News: लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही. बिहारसह इतर राज्यांत निवडणुका आहेत. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच व्यक्त केले होते. उद्धव ठाकरेंच्या या मागणीची दिल्लीने दखल घेतल्याची माहिती मिळत आहे. इंडिया आघाडीची लवकरच एक बैठक होणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली.
संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीची बैठकीबाबत विधान केले होते, त्यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत का, असेही विचारण्यात आले. यावर संजय राऊत म्हणाले की, नक्कीच. उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे. तशी आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत.
काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांचा फोन
काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांचा फोन होता. इंडिया आघाडीची बैठक व्हावी. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक होऊ शकलेली नाही. इंडिया आघाडीचे अनेक सदस्य अस्वस्थ आहेत. या सगळ्यांची एक बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणासंदर्भात एक दिशा ठरवणे गरजेचे आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडली होती. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात हालचाली सुरू आहेत. इंडिया आघाडीची बैठक नक्कीच होत आहे आणि उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आम्ही जाहीर करू, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, दिल्लीतील इंडिया आघाडी ही राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर निर्णय घेण्यासाठी निर्माण झालेली एक रचना आहे. खास करून लोकसभा संसदेचे कामकाज, राष्ट्रीय आंदोलन, राष्ट्रीय प्रश्न, या विषयावरती इंडिया आघाडीत चर्चा होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर इंडिया आघाडीतील बैठकीत चर्चा करणे हे मूर्खपणाचे आहे. यासाठी महाविकास आघाडी आहे, अजून काही व्यवस्था एकत्र काम करण्यासंदर्भात आहेत त्यात चर्चा होईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.