उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:49 IST2025-11-21T19:48:51+5:302025-11-21T19:49:25+5:30
Shiv Sena Thackeray Group News: भाजपाचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी देत असल्याने ज्येष्ठ नेते नाराज होते.

उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
Shiv Sena Thackeray Group News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत. यातच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील अंतर्गत कलह चांगलाच चव्हाट्यावर येत आहे. यातच मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा नकार कायम असून, स्वबळाची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यातच मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होत हाती शिवबंधन बांधले.
टिटवाळ्यातील भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर, भाजपा ठाणे जिल्हा सचिव प्रदिप भोईर ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना उपनेते विजय (बंड्या) साळवी, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, जिल्हासंघटक रेखा कंटे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
सुरेश भोईर हे नाराज होते
भाजपाचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी देत असल्याने सुरेश भोईर हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. यानंतर भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. तर या भागात आता ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सुरेश भोईर यांचा प्रभाग आरक्षणात आहे. ते त्यांच्या मुलासाठी तिकीट मागत होते. त्यांना तिकीट मिळणार नाही याबाबत शंका होती. या भीतीने उद्धव ठाकरे पक्षात ते गेले. ज्यांना संभ्रम आहे ते आमच्याशी थेट बोलतात. आमच्याशी बोलणे झाल्यावर खात्री पटल्याने ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारही करत नाही. सुरेश भोईर यांनी चर्चा केली असती तर त्यांना आम्ही क्लियर केले असते. त्यांनी नेत्यांशी चर्चा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते नरेंद्र पवार यांनी दिली.