तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा १,८०० कोटींतून कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 07:42 IST2026-04-13T07:42:09+5:302026-04-13T07:42:09+5:30
Tuljapur News: कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आखण्यात आलेल्या १,८०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे.

तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा १,८०० कोटींतून कायापालट
तुळजापूर (जि. धाराशिव) - कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आखण्यात आलेल्या १,८०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेतली जाणार असून, येत्या १५ दिवसांत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कालबद्ध आराखडा सादर करावा, असे निर्देश दिल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी दिली.
भाविकांची गर्दी आणि भौगोलिक आव्हाने लक्षात घेऊन वृद्ध, दिव्यांग भाविकांना पायऱ्या चढण्या-उतरण्याचा त्रास होऊ नये, यासाठी महाद्वाराजवळ लिफ्ट बसवण्यात येणार आहे. लिफ्टमुळे एका भुयारी मार्गातून भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोहोचता येईल. तसेच, महाद्वारातून थेट दर्शन मंडपात प्रवेश देणारी यंत्रणाही सुरू केली जाईल. तुळजापूरच्या वैभवात भर घालण्यासाठी १०८ फुटी पुतळा आणि अद्ययावत वस्तूसंग्रहालय उभारले जाणार आहे.