मायलेकीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: May 22, 2015 01:37 IST2015-05-22T01:37:22+5:302015-05-22T01:37:22+5:30

माय-लेकींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाकड येथे घडली.

Trying to burn myelike alive | मायलेकीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मायलेकीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पिंपरी : माय-लेकींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाकड येथे घडली. यामध्ये दोघी गंभीररीत्या भाजल्या असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
योगिता जीवन परदेशी (३८) या डांगे चौकातील शिवाजी पुतळ्याजवळ हातगाडीवर वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी त्या नेहमीप्रमाणे हातगाडीवर होत्या. रात्री गाडी बंद करून घरी परतण्याच्या तयारीत असतानाच त्या ठिकाणी आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी योगिता व कोमल (१८) या मायलेकींवर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले.
हा प्रकार पाहिल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित आग विझवून दोघींनाही तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. योगिता ५५ टक्के, तर कोमल १० टक्के भाजली आहे. हा प्रकार कोणत्या कारणासाठी आणि कोणाकडून करण्यात आला, हे समजू शकलेले नाही.

Web Title: Trying to burn myelike alive