Accident: भरधाव शिवशाही बसची दुचाकीला भीषण धडक, ३ जण जागीच ठार, अपघात नेमका कसा घडला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:47 IST2026-01-05T19:45:42+5:302026-01-05T19:47:13+5:30
बुलढाणा-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धाड गावाजवळ शिवशाही बस आणि दुचाकीत भीषण धडक झाली.

Accident: भरधाव शिवशाही बसची दुचाकीला भीषण धडक, ३ जण जागीच ठार, अपघात नेमका कसा घडला?
बुलढाणा-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धाड गावाजवळ शिवशाही बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अ झालेल्या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. हे तिघेही तरुण २० वर्षांखालील असून त्यांच्या मृत्युची बातमी कळताच ढालसावंगी गावावर शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून बुलढाण्याकडे जाणारी शिवशाही बसने धाड गावाजवळ समोरून येणाऱ्या एका दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका पाचारण केली आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच या तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले.
अपघातात मरण पावलेले तिघेही तरुण २० वर्षांपेक्षा कमी वयाचे असून एकाच गावातील रहिवाशी होते. कैशास दांडगे, रवी चंदनशिव आणि अंकुश पाडळे, अशी तरुणांची नावे आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून वाहतूक सुरळीत केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.