विदर्भात मुसळधारेचा इशारा, मराठवाड्यात तूर्तास दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:17 IST2025-07-26T12:17:07+5:302025-07-26T12:17:21+5:30
आलापल्ली-भामरागड मार्ग बंद; लातूर, बीड, परभणी जिल्ह्यात संततधार

विदर्भात मुसळधारेचा इशारा, मराठवाड्यात तूर्तास दिलासा
गडचिरोली/मुंबई : जिल्ह्याला शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी संततधार पावसाचा तडाखा बसला. नद्या, नाले तुडुंब झाले असून, भामरागडमध्ये पर्लकोटा नदीला पूर आला. पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडसह शंभरवर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. मराठवाड्यातील जिल्हांनाही पावसाने दिलासा मिळाला.
पुरामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद असून, जिल्ह्यातील पाच मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने दक्षिणेकडील शाळा, महाविद्यालयांना २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली होती.
२४ तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ९९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील नऊ विभागांमध्ये अतिवृष्टी झाली असून, ताडगाव परिसरात १२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद आहे. पुढील २४ तासांत भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्याला दिलासा
परभणी : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोनपेठ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बीड : शहरात शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून रिमझिम पाऊस सुरू झाला. दुपारी थोड्या वेळ विश्रांतीनंतर पुन्हा तीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला.
लातूर : सव्वा महिन्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाची रिमझिम बरसात सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून अधूनमधून रिमझिम पाऊस होत आहे.
नाशिक : जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासूनच शहर व परिसरात सरींचा वर्षाव केला.
राज्यातील २९९७ धरणांत ६४.९० टक्के जलसाठा
खामगाव (जि. बुलढाणा) : राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात २९९७ जलसाठ्यांमध्ये एकूण ६४.९० टक्के जलसाठा नोंदविला गेला असून, तो गतवर्षीच्या याच कालखंडातील साठ्यापेक्षा अधिक असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गतवर्षी याच काळात राज्यातील एकूण साठा ४७.९४ टक्के इतका होता.
विभागनिहाय पाणीसाठा
विभाग साठा (टक्केवारीत)
नागपूर ५३.२१
अमरावती ५२.८९
छ. संभाजीनगर ४९.५५
नाशिक ६१.०९
पुणे ७६.००
कोकण ८२.२९