मुंबई - राज्यातील हवामानात पुढील काही दिवसांत बदल होण्याची शक्यता आहे. येत्या १७ ते २० मार्च या ४ दिवसात राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या कालावधीत विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. १७ ते २० मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी
शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रचंड उष्णतेत देशातील काही भागात हवामानात बदल होताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल. काही भागात पाऊस हजेरी लावेल. राजधानी दिल्लीतही पुढील २-३ दिवसांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात जोरदार वारे सुटेल. जम्मू काश्मीर आणि लडाख या भागात १७ मार्चपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पहाडी भागात बर्फवृष्टीमुळे तापमान घसरेल आणि थंडी जाणवून येईल. तर पश्चिम भारतात हवामान उष्ण राहील. सौराष्ट्र आणि कच्छवर उष्णतेच्या लाटांपासून तीव्र उष्णतेच्या लाटांचा परिणाम सुरूच राहील. गुजरातमध्येही उच्च तापमानाचा इशारा देण्यात आला आहे.
Web Summary : Maharashtra faces thunderstorms and rain from March 17-20. Farmers are advised to protect harvested crops. Vidarbha, Marathwada, Khandesh, and central Maharashtra are likely to be most affected.
Web Summary : महाराष्ट्र में 17-20 मार्च तक गरज और बारिश की संभावना है। किसानों को सलाह दी जाती है कि वे काटी गई फसलों की सुरक्षा करें। विदर्भ, मराठवाड़ा, खानदेश और मध्य महाराष्ट्र सबसे अधिक प्रभावित होने की संभावना है।