विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका; एकनाथ शिंदेंनी घेतला विरोधकांचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:57 IST2025-11-27T18:55:02+5:302025-11-27T18:57:33+5:30
Deputy CM Eknath Shinde News: आगामी निवडणुकीत विकासाला अडथळा आणणाऱ्यांचा पराभव करा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका; एकनाथ शिंदेंनी घेतला विरोधकांचा समाचार
Deputy CM Eknath Shinde News: देशामध्ये जहागीरदार ही संकल्पना कधीच मोडीत निघाली आहे. परंतु तळोदा हा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून येथील आदिवासी समाजाला मालक बनवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिला. तळोदा नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार क्षत्रिय सरवनसिंह आणि अन्य २१ उमेदवार तसेच नंदुरबार नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी आणि ४१ उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे तळोदा येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीत विकासाला अडथळा आणणाऱ्यांचा पराभव करून नगर परिषदांवर भगवा फडकवण्याचे आवाहन केले.
तळोद्यासाठी दिलेल्या विकासनिधीचा तपशील मांडताना त्यांनी आजवर दिलेल्या १२५ कोटींपैकी राजपथ रस्त्यासाठी २२ कोटी, पाणीपुरवठा योजनांसाठी १६ कोटी आणि बोटॅनिकल गार्डनसाठी २ कोटी वाटप झाल्याचे सांगितले. शहरासाठी भविष्यातील विकास आराखडा जाहीर करत त्यांनी नवीन फिल्टर प्लांट, स्वच्छ पाणीपुरवठा, डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलविणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली.
तळोद्यात बदलाची सुरुवात झाली आहे
तळोद्यात बदलाची सुरुवात झाली आहे. महिलांचा सन्मान, स्वावलंबन आणि संरक्षण ही सरकारची प्राथमिकता आहे. लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहेच, पण ती आणखी प्रभावीपणे राबवली जाणार आहे. याचबरोबर मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण, एसटी प्रवासात ५० टक्के सूट, माता सुरक्षित परिवार आणि स्वरोजगारासाठी आर्थिक मदत यांसारख्या योजनांची आठवण त्यांनी करून दिली.
दरम्यान, मुक्ताईनगर आणि परिसरासाठी मुख्यमंत्री असताना केलेल्या निधी वितरणाचा उल्लेख करत त्यांनी सिंचनासाठी ३५०० कोटी, रस्त्यांसाठी ५०० कोटी, एमआयडीसीसाठी ५०० कोटी आणि पुलांसाठी १५० कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. दोन डिसेंबरला धनुष्यबाणाचं बटण दाबा. बाकी विकास माझ्यावर सोडा. मी दिलेला शब्द आणि तुमचा विश्वास हे दोन्ही मी पाळणार, असे शिंदे म्हणाले.