तिसऱ्या मुंबईत रायगड-पेण ग्रोथ सेंटर; एक लाख कोटीची गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 06:54 IST2026-01-22T06:54:06+5:302026-01-22T06:54:40+5:30
दावोसमधील एकॉनॉमिक फोरमवरून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

तिसऱ्या मुंबईत रायगड-पेण ग्रोथ सेंटर; एक लाख कोटीची गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, दावोस: तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करतानाच तेथे पहिल्या टप्प्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून त्यासाठीचे करारदेखील झाले आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
येथील जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत असलेले फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई विमानतळापासून १५-२० किमीवर ग्रोथ सेंटर उभारले जाईल. या ठिकाणी ‘प्लग ॲण्ड प्ले’ या धर्तीवर ‘रेडी टू स्टार्ट’ पद्धतीने लगेच कामकाज सुरू होईल. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी – सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. या ठिकाणी नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करत असून ग्लोबल कॅपेसिटी सेंटर्स, फिनटेकची इको सिस्टिम तयार होईल.
फडणवीस व बर्मुडा देशाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांच्यात चर्चा झाली. ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनी फडणवीस यांची भेट घेत पुणे येथील प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले.
या विदेशी कंपन्या येणार
हवाना ग्रुप, एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स, रिव्हर रिसायकल समूह, एमजीएसए समूह, स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स या विदेशी कंपन्यांच्या गुंतवणूकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल.
वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती
महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे, असे नमूद करून या वर्षाच्या अखेर पर्यंत १६ गिगा वॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अदानी समूह महाराष्ट्रात ६६ अब्ज डॉलर्स गुंतवणार
- जागतिक आर्थिक परिषदेच्या ५६ व्या वार्षिक बैठकीत अदानी समूहाने आगामी ७ ते १० वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ६६ अब्ज डॉलर्स (सुमारे ५.५ लाख कोटी रुपये) गुंतवण्याची घोषणा बुधवारी केली.
- विमान वाहतूक, हरित ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक उत्पादन क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार असून, यामुळे राज्यात लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.
- महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी गुंतवणुकीची गरज आहे, त्यामुळे अदानी समूह असो वा अन्य कोणी, गुंतवणुकीचे आम्ही मनापासून स्वागत करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची भूमिका स्पष्ट केली.
नेमकी गुंतवणूक कुठे?
३,००० मेगावॅट क्षमतेचे ग्रीन डेटा सेंटर पार्क, विमानतळाजवळ एक एकात्मिक एरिना जिल्हा, कोल गॅस्टीफिकेशन सुविधा, ८,७०० मेगावॅटचे पंप-स्टोरेज जलविद्युत प्रकल्प आणि सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट्स यामध्ये अदानी समूह गुंतवणूक करणार आहे.