Video : तब्बल हजारच्यावर बकऱ्या पळविणारा 'तो' गजाआड ;चोरीच्या 'स्टाईल'ने पोलीसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 12:03 IST2020-12-25T11:49:37+5:302020-12-25T12:03:35+5:30
चलाखी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या बकऱ्यांच्या चोरीची सर्वत्र चर्चा..

Video : तब्बल हजारच्यावर बकऱ्या पळविणारा 'तो' गजाआड ;चोरीच्या 'स्टाईल'ने पोलीसही चक्रावले
पुणे : गुन्हेगार आपल्या हुशारीने कितीही सफाईदारपणे गुन्हे करत असला तरी काही ना काही धागेदोऱ्यांच्या आधारे तो कायद्याच्या जाळयात अडकल्याशिवाय राहत नाही.अशाच प्रकारे पुण्यात देखील आश्चर्य चकित करणारी चोरीची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीकडून तब्बल ६ सहाचाकी , ४ चारचाकी आणि २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. पण आरोपीकडे केलेल्या कसून तपासात एक आणखी धक्कादायक बातमी पुढे आली आणि पोलीस देखील चक्रावून गेले.
पुण्यातील खडकी पोलिसांनी २२ वर्षांच्या अलेक्स लवरेन्स ग्राम्सला अटक केली आहे. तो खडकी बाजारातील एका गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे.
आणि त्याने आतापर्यंत एक नाही, दोन नाही तर ७० ठिकाणाहून हजारपेक्षा अधिक बकऱ्या चोरल्या आहेत. त्याच्या या कौशल्याने मात्र पोलिसही आश्चर्य चकित झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी बाजार येथील गुन्हेगारी टोळीतल्या साथीदारांसोबत तो गाड्या चोरत होताच पण या गाड्यांचा वापर ते विकण्याऐवजी बकरी चोरण्यासाठी करत होते. गावाबाहेर कमी गर्दीच्या ठिकाणच्या गोठ्यात ते एखादा गोठा किंवा बकरी बांधलेले ठिकाण निश्चित करत असत. त्यानंतर चोरलेल्या गाडीत बसून चार ते पाच सदस्य बकरी चोरण्यास मध्यरात्री जात असत. बकरी ओरडण्याचा आवाज आत झोपलेल्या व्यक्तींना येऊ नये म्हणून चारचाकीचा आवाज सुरु ठेवला जायचा. बकरीच्या जिभेला बाभळीचा काटा लावला जात होता. आणि मग अशा अनेक बकऱ्या घेऊन ते आठवडे बाजारात विकत होते. सुशिक्षित तरुणाने चलाखी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या या बकरी चोऱ्याची चर्चा मात्र सर्वत्र सुरु आहे.
पुणे , पिंपरी चिंचवड, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातल्या विविध भागात अलेक्स व त्याच्या टोळीने वाहने आणि बकऱ्या चोरल्या आहेत. सध्या त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांकडून या गुन्ह्याचा कसून तपास सुरु आहे. बकरी चोरीला जाण्याच्या बहुतांश घटना खेडेगावात घडल्याने नागरिकांनीही तक्रारी केलेल्या नाहीत. त्यामुळे आता पोलीस प्रत्यक्ष त्याने सांगितलेल्या जागी जाऊन तपास करणार आहेत.
- दत्ता चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी