राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
By संदीप आडनाईक | Updated: May 19, 2025 20:19 IST2025-05-19T20:17:05+5:302025-05-19T20:19:43+5:30
आमदार रोहित पवार यांनी पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी महायुतीत दोन पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनाही डिवचले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
- संदीप आडनाईक, कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटात सर्व काही आलबेल नाही अशा बातम्या येत आहेत, मात्र त्यात काही तथ्य नाही. शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे लवकरच काही निर्णय घेणार आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत या पक्षातील नेत्यांच्या नेतृत्वात बदल दिसतील, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित पवार सोमवारी कोल्हापुरातील दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
आमदार रोहित पवार म्हणाले, "ईडीने आजपर्यंत जे आरोप केले आहेत, त्यातील ९९ टक्के आरोप हे खरे नव्हते. या कायद्यामध्ये चांगले बदल होत असतील, तर स्वागतच आहे. विरोधी पक्षांनी जनतेसाठी एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर रस्त्यावर उतरायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही."
पालकमंत्रिपदाचा विषय २०२९ मध्ये सुटेल
"रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा विषय २०२९ मध्ये सुटेल. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे पालकमंत्रिपदाची जबाबदारी मुख्यमंत्री स्वत:कडे घेतील असे वाटते. बीडमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचा वचक कमी पडत आहे", अशी टीका त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर केली.
वाचा >>लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
"अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्तेतील नेते गोकुळमध्ये राजकारण करत आहेत. कृषिमंत्री कुठेच दिसत नाहीत, त्यांना या अधिवेशनात शोधून काढू", असा इशारा रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंना दिला.
तिरंगा रॅली हा राजकीय स्टंट
तिरंगा रॅली काढताना राजकीय स्टंट केला जात आहे, हे अमित ठाकरे यांचे म्हणणे योग्य आहे. देशातील नागरिक केवळ भारतीय सैन्यामुळे सुरक्षित आहेत. जवानांना क्रेडिट देण्यापेक्षा काही नेत्यांना क्रेडिट दिले जात आहे, असेही रोहित पवार म्हणाले.