कुजबुज: एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट पण मतदारसंघात भलतीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 07:48 AM2024-02-14T07:48:57+5:302024-02-14T07:50:14+5:30

खडसे ज्या लेवा-पाटील समाजातून येतात तो नाथाभाऊंच्या पाठीशी राहिला तर काय याची भाजपाला चिंता आहे

There is talk that not Eknath Khadse but BJP is in contact with Khadse | कुजबुज: एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट पण मतदारसंघात भलतीच चर्चा

कुजबुज: एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट पण मतदारसंघात भलतीच चर्चा

शिंदेंनाही लालपरीचा मोह

एसटी आणि प्रवाशांचे एक अतूट नाते आहे. तसेच काहीसे नाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटीचे असल्याचे दिसून आले. महाबळेश्वरवरून तापोळेला जात असताना मीदेखील एसटीचीच वाट पाहत असायचो. एसटी आणि आपले एक वेगळे नाते आहे, असे शिंदे यांनी मंगळवारी सांगितले. खोपट येथे एसटीच्या ई बसचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या एसटीशी जुळलेल्या आठवणींना उजाळा दिला. अखेर मोह न आवरल्याने त्यांनी एसटीत बसण्याचा आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांनाही एसटीची लालपरी प्यारी असल्याची कुजबुज सुरू झाली.

भाजपच्या संपर्कात नाथाभाऊ?

एकीकडे भाजपमध्ये प्रवेश कोण कोण करणार, याची चर्चा सुरू असतानाच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे जुने पण दुरावलेले ज्येष्ठ सहकारी एकनाथ खडसे हे पक्षात पुन्हा येण्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा ‘गौप्यस्फोट’ केला. त्याचा खडसे यांनी तत्काळ इन्कार केला व आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतच राहणार, असा खुलासाही केला, पण खरी चर्चा दुसरीच सुरू झाली. येत्या लोकसभा निवडणुकीत नाथाभाऊंच्या स्नुषा, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्याऐवजी  महाजन हेच रावेर लोकसभेचे उमेदवार असतील असे म्हटले जाते. त्यांना निवडून येण्यासाठी सर्व समाजघटकांच्या पाठिंब्याची गरज आहे. खडसे ज्या लेवा-पाटील समाजातून येतात तो नाथाभाऊंच्या पाठीशी राहिला तर काय याची भाजपाला चिंता आहे. त्यामुळे एक प्रयोग म्हणून खडसे भाजपाच्या संपर्कात अशी चर्चा जाणीवपूर्वक तर सुरू केली गेली नसेल ना, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गायकवाडांचा शिष्टाचार?

कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस  ठाण्यात द्वारली गावातील जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.  आ. गायकवाड हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. सोमवारी कल्याणमधील विविध विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम पत्रिकेवर आ. गायकवाड यांचे नाव होते. गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार करून आमदारपदाचा शिष्टाचार मोडला असला तरी त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करून महापालिका प्रशासनाने शिष्टाचार पाळला.

गोळीबारानंतर निशाणा कोणावर?

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात अद्याप स्थानिक भाजप नेत्यांनी पक्षाची अथवा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. गायकवाड प्रकरणावर मौन धारण करून हे प्रकरण लवकरात लवकर विस्मृतीत ढकलण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. मात्र, असे असताना भाजपचे कल्याण पश्चिम येथील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नेतृत्व कमी पडले, अशा शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही; पण त्यांचा निशाणा मंत्री रवींद्र चव्हाण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होता, अशी कुजबुज सुरू आहे. पवार यांना पक्ष समज देणार की त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणार, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: There is talk that not Eknath Khadse but BJP is in contact with Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.