"एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा...", मनसेच्या संदीप देशपांडेंनी नाव न घेता डिचवले, वाद चिघळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 11:19 IST2026-02-16T11:17:34+5:302026-02-16T11:19:50+5:30
मुंबई महापालिकेत उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाल्यापासून मनसेचे नेते संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध संदीप देशपांडे असे राजकीय शीतयुद्धही दिसू लागले आहे.

"एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा...", मनसेच्या संदीप देशपांडेंनी नाव न घेता डिचवले, वाद चिघळणार?
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यातील संघर्ष हळूहळू चव्हाट्यावर येताना दिसत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यावर राऊतांनी टीका केली. चंद्रपूरमध्ये उद्धवसेना भाजपासोबत गेल्यानंतर देशपांडेंनीही तोंडसुख घेतले. आता देशपांडेंनी राऊतांचे नाव न घेता 'एकच अतिशहाणा' म्हणत निशाणा साधला आहे.
सध्या टिप सुलतान मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून भाजपावर तोफ डागली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही खडेबोल सुनावले आहेत. सामना अग्रलेखावरूनच संदीप देशपांडे यांनी राऊतांना डिवचले आहे.
संदीप देशपांडे काय बोलले?
"एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा'मराठीतील म्हण आहे कुठल्याही लेखाशी साधर्म आढळ्यास तो निव्वळ योगायोग समजावा", असे म्हणत संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
"एकच अतिशहाणा,तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा"मराठीतील म्हण आहे कुठल्याही लेखाशी साधर्म आढळ्यास तो निव्वळ योगायोग समजावा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 16, 2026
भाजपासोबत जाण्यावरून केला होता गंभीर आरोप
चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेने भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी असा दावा केला की, उद्धवसेनेच्या नगरसेवकांना एक-एक कोटी रुपये दिले गेले. यावरून खासदार संजय राऊतांनी देशपांडेंवर टीका केली होती.
त्याचबरोबर उद्धवसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनीही पुरावा द्या म्हणत आव्हान दिले होते. त्यावर देशपांडे म्हणालेले की, 'ज्या दिवशी जनतेला तुम्ही पन्नास खोक्यांचे पुरावे द्याल, त्या दिवशी शंभर टक्के चंद्रपूरमधील एक खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार', असे म्हणत देशपांडेंनी उद्धवसेनेला डिवचले होते.