आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:13 IST2025-10-06T13:11:21+5:302025-10-06T13:13:32+5:30
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकमत आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
मुंबई - कुणी काहीही म्हटलं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद, व्यक्तिगत आणि राजकीय नाते अतिशय घट्ट झालं आहे. अगदी स्पष्ट सांगायचे झाले तर, कुणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी चर्चा फार दूरपर्यंत गेली आहे. आता माघारीचे दोर नाहीत. प्रकरण फार पुढे गेलंय. त्यामुळे कुणी कुठल्या मेळाव्यात काहीही वक्तव्य केले, हे दोन भाऊ कसे एकत्र येतात ते पाहू...मात्र तुमच्या छाताडावर पाय रोवून हे दोन्ही ठाकरे बंधू उभे राहण्याच्या मनस्थितीत आहेत असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊतांनी स्पष्ट भाष्य केले. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक सोहळ्यात एकत्र होते. तिथून ते मातोश्रीवर गेले. या दोघांमध्ये चर्चा झाली आणि ही चर्चा राजकीय झाली. मुंबईसह महाराष्ट्रात २७ महापालिका आहेत. हा खेळ नाही. अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागेवर, पॅनलवर चर्चा होणे गरजेचे आहे. राजकीय परिस्थिती वेगळी आहे. या सर्व गोष्टींवर चर्चा सुरू आहे. प्रत्येक महापालिकेत दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करत आहेत. तिथे आम्ही असायला हवे असे नाही. स्थानिक पातळीवर दोन्ही बाजूचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मविआ आम्हाला सोडून गेली नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचं अस्तित्व, कार्य, भूमिका आणि महत्त्व कायम आहे. महापालिकेबाबत वेगळा विचार असतो. कुठे मविआ असेल, कुठे शिवसेना-मनसे मविआला सामावून घेऊ शकते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गणिते आहेत. कुठे सेना-मनसे चालेल, कुठे मविआला सोबत घ्यावे लागेल. त्या त्या भागात एकत्र बसून आम्हाला अंतिम निर्णय घ्यावा लागेल. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकमत आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, या प्रमुख महापालिकांशिवाय अशा अनेक महापालिका आहेत, जिथे शिवसेना आहेच, मनसेही आहे, काही ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे. त्या सगळ्यांचा विचार व्हावा लागेल. मुंबईचा महापौर मराठी बाण्याचा होईल. भगव्या रक्ताचा होईल. दिल्लीचे जोडे उचलणारा कुणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. हुतात्मा चौकात जाऊन महाराष्ट्राची गर्जना करेल असा महापौर होईल. मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या शिवसेना-मनसे संघटना आहेत. ठाकरे बंधूंचा महापौर होईल. शिवसेना-मनसे ही फक्त राजकीय युती नाही, दिल दिमाग यातून ही युती आहे असं संजय राऊतांनी म्हटलं.