'...तर सगळेच्या सगळे मेले असते'; पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशाने सांगितलं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:45 IST2025-01-22T19:43:14+5:302025-01-22T19:45:47+5:30
Pushpak express accident reason: जळगाव स्थानकावरुन दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली होती. रेल्वे चेन खेचल्यामुळे उभी होती. त्याचवेळी अफवा पसरली आणि ही घटना घडली.

'...तर सगळेच्या सगळे मेले असते'; पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशाने सांगितलं काय घडलं?
Pushpak Express Accident: जळगाव जिल्ह्यात भयंकर रेल्वेअपघात झाला. परधाडे (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडीखाली चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या लखनौच्या एका प्रवाशाने काय घडलं, याबद्दल माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुधवारी (२२ जानेवारी) दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जळगाव स्थानकावरुन दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली होती. माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली.
त्यामुळे रेल्वे रुळांवर ठिणग्या उडत गेल्या. परधाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबवण्यात आली. तेव्हा एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. तशातच समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काहीजण रेल्वेगाडीखाली चिरडले गेले.
चहावाला म्हणाला आग लागली अन्...
या अपघातात जखमी झालेल्या लखनौच्या एका प्रवाशाने सांगितलं की, 'एक चहावाला म्हणाला की ट्रेनमध्ये आग लागली आहे. रेल्वे उभी होती. त्यामुळे सगळे पळायला लागले. खाली उतरून पळत असताना समोरून ट्रेन (कर्नाटक एक्स्प्रेस) आली. इंजिननंतर तीन डब्बेच एक्स्प्रेसने पार केले. जर पूर्ण ट्रेन पार करून कर्नाटक एक्स्प्रेस गेली असती, तर सगळेच्या सगळे मेले असते. पुष्पक एक्स्प्रेस थांबलेली होती.'
१२ जणांचे मृतदेह हाती
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालात १२ जणांचे मृतदेह दाखल झाले. तर ५ जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.