...तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:40 IST2026-01-07T12:37:47+5:302026-01-07T12:40:07+5:30
महामानवांविषयी वाट्टेल ती विधाने करून गैरसमज पसरवायचे हा भाजपचा १०० वर्षांचा नियोजनबद्ध अजेंडा

...तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे - सतेज पाटील
कोल्हापूर : भाजप आणि राष्ट्रवादी हे मतांसाठी भांडत आहेत. इकडे एकमेकांवर टीका करायची आणि तिकडे कॅबिनेट बैठकीला मांडीला मांडी लावून बसायचे. सभांमध्ये एकमेकांना इशारे द्यायचे काम सुरू आहे ते १५ जानेवारीपर्यंत सुरूच राहणार, परंतु या आरोप-प्रत्यारोपात खरोखरच भाजपचे विचार पटत नसतील, तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले, लातूर येथे सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल अनुद्गार काढले आणि आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली. मी त्यांचा निषेध करतो. एका पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष असले, तरी त्यांच्यात प्रगल्भता नसल्याचे दिसून आले.
वाचा: सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार
बिनविरोध निवडींबाबत तक्रारीची दखल घेणे वेगळे आणि कारवाई करणे वेगळे. निवडणूक आयोग फक्त आमची दखलच घेत आला आहे. कारवाई कधी होणार, हा खरा प्रश्न आहे. पैशांचे आमिष, दबाव, गुंडगिरीने बिनविरोध निवडीचा हा नवा ट्रेंड महायुतीने सुरू केला आहे. तो यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राला मान्य नाही.
हा तर भाजपचा १०० वर्षांचा अजेंडा
पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महामानवांविषयी वाट्टेल ती विधाने करून गैरसमज पसरवायचे हा भाजपचा १०० वर्षांचा नियोजनबद्ध अजेंडा आहे.
आपण पुस्तके वाचून या महामानवांविषयी माहिती घेतली; परंतु आणखी ५० वर्षांनी सोशल मीडिया आणि डिजिटल फूटप्रिंटवरील माहिती त्या पुढच्या पिढीला खरी वाटणार आहे. त्यासाठीच खरा इतिहास पुसण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे हाेते, असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील बोलत होते.