सह्याद्रीत 'चंदा' आणि 'तारा'च्या जोडीला आता 'हिरकणी'ही येणार, महिनाभरात दाखल होणार तिसरी वाघीण
By संदीप आडनाईक | Updated: January 14, 2026 12:57 IST2026-01-14T12:56:25+5:302026-01-14T12:57:12+5:30
बार्शीतील वाघाची अफवा

संग्रहित छाया
संदीप आडनाईक
कोल्हापूर : ‘ऑपरेशन तारा’ या उपक्रमांतर्गत वन विभागाने मंगळवारी सायंकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित केलेली तिसरी वाघीणही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार आहे. या वाघिणीला वन विभागाच्या भाषेत 'एसटीआर ०६' असा सांकेतिक क्रमांक मिळणार असला तरी सह्याद्रीच्या कडेकपारीत संचार करण्यासाठी सज्ज असलेल्या या वाघिणीला 'हिरकणी' या नावाने ओळखले जाईल.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांतून आठ वाघ (तीन नर आणि पाच मादी) 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त टप्प्याटप्प्याने आणले जात आहेत. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील अलिझांझा पर्यटन क्षेत्रातून 'चंदा' (एसटीआर ०४) नावाच्या वाघिणीला आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून 'तारा' (एसटीआर ०५) वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणले आहे.
डेहराडून येथील वन्यजीव संस्थेतील तज्ज्ञ आणि ताडोबा-सह्याद्रीच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली वन्यजीव रुग्णवाहिकेमधून रस्ते मार्गाने या दोन्ही वाघिणी सह्याद्रीत आणल्या आहेत. सह्याद्रीत 'बाजी', 'सुभेदार' आणि 'सेनापती' हे तीन नर वाघ आधीपासूनच वास्तव्यास आहेत.
वाचा : सह्याद्रीच्या जंगलात वाघांचे ‘व्हाॅट्सॲप; सेनापती अन् चंदाच्या भेटीचे संकेत, ट्रॅप कॅमेऱ्यातून समोर आले रंजक दृश्ये
या महिन्यात येणाऱ्या वाघिणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी आणि स्थलांतरास योग्य असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरच या तिसऱ्या वाघिणीला सह्याद्रीत आणले जाणार आहे. तिच्या प्रवासाची आणि सॉफ्ट रिलिजची संपूर्ण प्रक्रिया भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या कार्यक्रमानुसार होणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. जितेंद्र रामगावकर, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. के. रमेश, तसेच फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील, प्रोजेक्ट टायगरचे सहायक निरीक्षक डॉ. नंदकिशोर काळे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण कार्यरत आहेत.
बार्शीतील वाघाची अफवा
गेल्या वर्षभरापासून बार्शी तालुक्यात एक वाघ जनावरांवर हल्ला करत असल्याची आणि त्याला सह्याद्रीत सोडण्यात येणार असल्याची अफवा पसरलेली आहे. बार्शी परिसरात वाघाचा अधिवास नाही. याबाबत ताडोबा अभयारण्यातील तज्ज्ञांच्या पथकावर या वाघाचा माग काढण्याची जबाबदारी दिली होती, त्यानुसार हे पथक गतवर्षी बार्शी येथे दाखल झाले होते; परंतु वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ त्यांना आढळून आलेला नाही. त्यामुळे हा तथाकथीत वाघ सह्याद्रीत सोडण्यात येणार असल्याची अफवा असल्याचे तुषार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.