महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:28 IST2025-10-17T13:27:14+5:302025-10-17T13:28:05+5:30
Vijay Wadettiwar Criticize Mahayuti Government: सरकारने जी मदत दिली आहे,त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी ठरणार आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
नागपूर – राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र १८०० कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. सरकारने जी मदत दिली आहे,त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी ठरणार आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यांबाबत सरकारने दिवाळीपूर्वी मदत करू, असे सांगितले पण जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, घर पडली आहेत. २५३ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे, पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच आहे. त्यात जास्तीची मदत नाही.ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडल्या आहेत त्यांना दिलेली मदत तीन वर्षात मिळणार आहे तोपर्यंत शेतकरी कसा जगणार? त्यामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. कापूस खरेदीला अजूनही सीसीआय कडून परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी टाकलेल्या अटी जाचक आहेत,त्यामुळे कापूस खरेदी करताना हात आखडता घेतला जाणार आहे,यामुळे शेतकरी बरबाद होऊन जाईल. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिक गेले आहे त्यात मिळणारा भाव इतका कमी आहे की शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा हा छळ करू नये अशी टीका वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलतांना केली.
मराठवाड्यात आज ओबीसी समाजाचा मोर्चा निघत आहे,यावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी या मोर्चाला शुभेच्छा दिल्या आहेत. बीडमध्ये होणाऱ्या मोर्चात सरकार मधील दोन मंत्री आणि धनंजय मुंडे,गोपीचंद पडळकर सारखे पॉवरफुल आमदार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे इतका मोठा मोर्चा झाल्यावर २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द हा झालाच पाहिजे. हा जीआर सरकारने काढला आहे त्यामुळे तो रद्द करण्याची जबाबदारी या मंत्र्यांवर येते, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यावरील विद्यमान व्यवस्थापन मंडळाऐवजी पणन मंत्र्यांच्या हातात कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्र जाणार आहे. यातून मंत्र्यांना मलिदा खाण्याची सोय करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कोट्यवधीची उलाढाल होते त्यावर मंत्र्यांची वाईट नजर गेल्याने हा निर्णय झालेला आहे. निवडून आलेले प्रतिनिधी ,मंडळ बरखास्त करणे हा अन्याय आहे अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली.