“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:24 IST2025-10-11T09:20:54+5:302025-10-11T09:24:35+5:30
Sanjay Raut Letter To CM Devendra Fadnavis: लोकशाही वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. लोकशाही बळकट व्हावी, हीच भावना आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
Sanjay Raut Letter To CM Devendra Fadnavis: निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. १४ ऑक्टोबर रोजी १२.३० वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तसेच या सर्वपक्षीय शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभागी व्हावे, अशी विनंती केली आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरच घोषित होतील. जिल्हा परिषदा, नगरपालिका व राज्यांतील महानगर पालिकांचा यात समावेश आहे. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकांच्या यंत्रणेवर आणि प्रकियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आहे.
स्वतः सहभागी व्हावे अन् शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत काही शंका नक्कीच आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षिय शिष्टमंडळ दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. शिष्टमंडळात सहभागी होण्याबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना कळविले आहे व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माझी आपणास विनंती आहे की या शिष्टमंडळात आपण स्वत: सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून, लोकशाही बळकट व्हावी व निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा हीच भावना आहे, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीचे प्रभाग आरक्षण एक प्रकारे स्पष्ट झाल्याने उमेदवारीचे वेध लागलेल्या माजी नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे. २२७ प्रभागांपैकी १५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी आणि दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात आली आहे. संबंधित संभाव्य आरक्षणाच्या प्रभागात २०१७ मध्ये तेव्हाच्या एकसंध शिवसेनेचे ५, काँग्रेस, मनसे आणि भाजपचा प्रत्येकी एका नगरसेवक निवडून आला होता. या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे यापैकी किती जणांची उमेदवारी कायम राहते. त्यांचे अन्य प्रभागांत पुनर्वसन होणार का? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. प्रत्येक पक्षाला येथे उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 11, 2025
१४ ऑक्टोबर १२.३० वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत
मा .शरद पवार,उद्धव ठाकरे,हर्षवर्धन… pic.twitter.com/KyvPNgyKL9