सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 13:10 IST2025-08-15T13:09:19+5:302025-08-15T13:10:20+5:30
भाजपात जसं एकाधिकारशाही आहे तशीच पद्धत अजित पवारांच्या पक्षात आलेली आहे. कोकणातील एका नेत्याने पक्षाला हायजॅक केलेले आहे असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.

सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
मुंबई - छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पक्षाच्या युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या २० दिवसांत सूरज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र सूरज चव्हाण निवडीबाबत अजित पवारांनी मला माहिती नाही असं विधान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
माध्यमांनी सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीवर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, मला ती गोष्ट माहिती नाही. मी त्या बैठकीला नव्हतो. मी त्याबद्दल माहिती घेतो. मला त्यावेळी जे खटकले मी त्याबद्दल निर्णय घेतला. ज्या गोष्टी मला खटकतात त्याबद्दल मी तडकाफडकी निर्णय घेत असतो असं उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या निवडीबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनाच अंधारात ठेवले का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर घटना घडली, ती कशामुळे घडली, त्याबद्दलच्या तातडीने प्रतिक्रिया मी त्याचवेळी दिली होती. घडलेल्या घटनेबाबत तीव्र शब्दात निषेध केला. राष्ट्रीय अध्यक्षांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामाही घेतला होता. शेवटी घडलेल्या घटनेबद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची ती दिलेली आहे. गेली अनेक वर्ष सूरज चव्हाण पक्षाच्या संघटनेत काम करतात. पक्षाच्या कोअर ग्रुपने प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सूरज चव्हाण यांच्यावर विचारपूर्वक दिलेली आहे असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
"कोकणातील नेत्याने पक्ष हायजॅक केलाय..."
दरम्यान, भाजपात जसं एकाधिकारशाही आहे तशीच पद्धत अजित पवारांच्या पक्षात आलेली आहे. कोकणातील एका नेत्याने पक्षाला हायजॅक केलेले आहे. हे सर्व भाजपात जातील. त्यामुळे सूरज चव्हाणची नियुक्ती करताना तिथे अजितदादा नव्हते. दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता. तुमच्या पक्षातील नेत्यांवर तुमचं नियंत्रण राहिले नाही का असा प्रश्न उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.