Sunetra Pawar: रोहित पवारांच्या आरोपानंतर सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र; त्यात नेमकं काय लिहिलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:58 IST2026-03-25T17:58:49+5:302026-03-25T17:58:49+5:30
Sunetra Pawa Writes to Election Commission: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Sunetra Pawar: रोहित पवारांच्या आरोपानंतर सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र; त्यात नेमकं काय लिहिलं?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर पकड मिळवण्यासाठी धडपड सुरू असतानाच, नवनियुक्त अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक अत्यंत महत्त्वाचे पत्र पाठवले आहे. या पत्रामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची अधिकृत माहिती दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, "२८ जानेवारीनंतर पक्षाच्या वतीने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध धरला जाऊ नये. इथून पुढे मी जो पत्रव्यवहार करेन, तोच अधिकृत आणि ग्राह्य धरला जावा." या एका मागणीमुळे पक्षातील निर्णय प्रक्रियेवर आतापर्यंत प्रभाव असलेल्या तटकरे आणि पटेल यांच्या अधिकारांवर थेट गदा आल्याचे म्हटले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या बैठकीचे निमंत्रण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आले नव्हते. प्रदेशाध्यक्षांनाच डावलून बैठक होणे आणि त्यानंतर लगेच सुनेत्रा पवारांचे हे पत्र समोर येणे, यावरून पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.
रोहित पवारांचा खळबळजनक दावा
दुसरीकडे, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या वादावर भाष्य करत तेल ओतले. "अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता," असा दावा रोहित पवारांनी केला आहे. सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे रोहित पवारांच्या या दाव्याला एक प्रकारे पुष्टी मिळत असल्याचे बोलले जात आहे.
वर्चस्वाच्या लढाईत पुढे कोण?
सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला पक्षाचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ नेते आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्वतः सुनेत्रा पवार पक्षाची कमान आपल्या हाती घेऊ पाहत आहेत. निवडणूक आयोग आता सुनेत्रा पवारांच्या या पत्राची दखल घेऊन काय निर्णय घेते? यावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.