सहा शेतकऱ्यांची आत्महत्या

By Admin | Updated: September 4, 2015 00:57 IST2015-09-04T00:57:09+5:302015-09-04T00:57:09+5:30

उस्मानाबाद, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाच शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.

Suicide of Six Farmers | सहा शेतकऱ्यांची आत्महत्या

सहा शेतकऱ्यांची आत्महत्या

औरंगाबाद : उस्मानाबाद, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाच शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. तर सांगलीतही कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.
पानभोसी (ता़ कंधार) येथील भुजंग शंकरराव नरंगले (३४) तसेच मांडवी परिसरातील शंकर गंभीरा पवार (५५) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ यातील भुजंग नरंगले यांना २ एकर ३० गुंठे शेतजमीन आहे़ त्यांनी बँक तसेच खासगी सोसायटीतून सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे कर्ज घेऊन पेरणी केली़ पावसाअभावी पेरणी वाया गेली़ त्यामुळे कर्ज फेडावे कसे, या चिंतेने ग्रस्त होऊन त्यांनी बुधवारी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ शंकर गंभीरा पवार यांनीही सततची नापिकी व वाढत्या कर्जाच्या चिंतेमुळे गुरुवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली़
उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील युवा शेतकरी योगेश विलास चव्हाण (१९) याने सततची नापिकीला कंटाळून गुरूवारी सकाळी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली़ भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील शेतकरी लक्ष्मण भाऊराव पाटील (६५) यांना कॅन्सर झाला आहे़ एकीकडे उपचारावर होणारा खर्च आणि दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातून काहीच उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली़ फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव (खुर्द) येथील संतोष दादाराव मोटे (३४) या बुधवारी दुपारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. संतोषकडे एकूण अडीच एकर जमीन असून वर्षभरापूर्वीच त्यांनी आयसीआयसीआय बँकेतून कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच त्यांना बँकेचा ८५ हजारांचा हप्ता भरावयाचा होता. याच विवंचनेत ते असायचे.

‘त्या’ महिलेचा मृत्यू : कुटुंबियांच्या उपासमारीने निराश होत उस्मानाबादच्या अंबी (ता़भूम) येथील मनिषा लक्ष्मण गटकळ (३२) हिने २९ आॅगस्ट रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते़ उपचार सुरू असताना गुरूवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़
मणेराजुरीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
मणेराजुरी (सांगली) : येथील किरण बाळासाहेब जमदाडे (२३) या शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली.

Web Title: Suicide of Six Farmers