10th,12th Exam: कुठलाही ताण न घेता दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी सुरू ठेवावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 06:09 AM2021-04-18T06:09:29+5:302021-04-18T06:09:45+5:30

10th,12th Exam: इतर मंडळांनी दहावीच्या परीक्षांबाबत जाहीर केलेला पॅटर्न राज्य मंडळासाठी लागू होईल का?

Students should continue preparing for 10th and 12th exams without any stress! | 10th,12th Exam: कुठलाही ताण न घेता दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी सुरू ठेवावी!

10th,12th Exam: कुठलाही ताण न घेता दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी सुरू ठेवावी!

googlenewsNext

प्रत्येक शिक्षण मंडळ स्वायत्त आहे. त्यांची स्वतःची धोरणे, निर्णय प्रणाली असते. सध्याची काेराेनाची परिस्थिती पाहता विद्यार्थी हित व सुरक्षितता लक्षात घेऊनच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार नवीन वेळापत्रकाची आखणी हाेईल; मात्र इतर मंडळांप्रमाणेच निर्णय घेतला जाणार की नाही, याबद्दल आताच सांगता येणार नाही. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. इतर मंडळांप्रमाणे परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. त्यामुळेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षेसंदर्भातील नेमकी काय भूमिका आहे, हे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्याकडून जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.


नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांना कधीपर्यंत मिळेल ?
नवीन वेळापत्रकासाठी मंडळाचे सदस्य काम करीत असून, त्याची आखणी करून लवकरात लवकर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचावे, असा आमचा प्रयत्न आहे. नियमित व दिव्यांग विद्यार्थ्यांना वाढीव वेळ, आपल्याच शाळेत / महाविद्यालयांत केंद्र, सुरक्षात्मक उपाययोजना या सवलती कायम राहतील. प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजनही अशाच प्रकारे हाेईल. जून महिन्यात परीक्षेचे वेळापत्रक लागणार असल्याने देण्यात आलेली जून महिन्यातील विशेष संधी विद्यार्थ्यांना पुन्हा दिली जाईल की नाही, याचा पुनर्विचार करण्यात येईल.


पालकांनी मागणी केलेल्या ऑनलाइन परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन अशा पर्यायांचा विचार सुरू आहे का?
दहावी, बारावीच्या परीक्षांचे मूल्यमापन हा त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचा पाया असतो. कुठे प्रवेश घ्यायचा, कोणती शाखा निवडायची, हे या मूल्यांकनावरूनच ठरते. त्यामुळे वरील पर्याय ही तात्पुरती व्यवस्था असली तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. म्हणूनच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.


निकाल कमीतकमी वेळात लागतील, यादृष्टीने काेणते प्रयत्न सुरू आहेत?
सुरक्षित पद्धतीने परीक्षा घेणे हे जसे आव्हान आहे तसेच त्यांचा निकाल कमीत कमी वेळेत लावणे हे यंदाचे शिक्षण मंडळाचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपर्यंत यंत्रणेची चाचपणी केली जात आहे. विभागीय मंडळाकडून पेपर्स येण्याची वाट पाहण्यापेक्षा जिल्हा पातळीवर थेट शिक्षकांकडून त्यांचे कलेक्शन होईल, असे प्रयत्न सुरू आहेत.


शिक्षकांच्या लसीकरणासंदर्भात काय नियोजन आहे?
सद्यस्थितीत राज्यातील ४५ वर्षे व त्यापुढील शिक्षक लसीकरण करून घेत आहेत, त्यांना तशा सूचना दिल्या आहेत. ४५ वर्षांखालील शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षांच्या कामात सहभागी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी शिक्षण मंडळाने आरोग्य विभागास प्रस्ताव दिला आहे. येत्या काही दिवसांत त्यावर निर्णयाची अपेक्षा असून, परीक्षेपूर्वी लसीकरण पूर्ण करून घेतले जाईल.


पालक, विद्यार्थ्यांसाठी काय संदेश आहे?
काेराेनामुळे सुरक्षेची भीती विद्यार्थी, पालकांच्या मनात आहेच, शिवाय परीक्षा कशा पार पडतील, याचा मानसिक तणावही आहे; मात्र कुठलाही  ताण न घेेता   परीक्षेची तयारी सुरू ठेवा, मिळालेल्या वेळेकडे संधी म्हणून पाहत तिचा सदुपयोग करा. येणाऱ्या काळात आपण या परिस्थितीतून निश्चितच सुखरूप बाहेर पडून नवीन शैक्षणिक करिअरकडे वाटचाल करू, याची खात्री बाळगा.
(मुलाखत : सीमा महांगडे)

 

Web Title: Students should continue preparing for 10th and 12th exams without any stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा