प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी केलेल्या भाषणात राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते असलेल्या गिरीश महाजन यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. महाजन यांनी भाषणामध्ये ड़ॉ. आंबेडकरांचा उल्लेख टाळल्याने एका महिला अधिकाऱ्याने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर चौफेर टीका होत असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार लिहितात की, ‘आज प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये जो प्रकार घडला, तो महाराष्ट्राच्या पुरोगमित्वाला काळिमा फासणारा आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात या देशात लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे टाळले. प्रजासत्ताक दिनी संविधान निर्मात्यांचा उल्लेख न करणे, हा बाबासाहेबांचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
या ट्विटमध्ये वडेट्टीवार यांनी पुढे लिहिले की, भाजपची ही 'महाराष्ट्रद्रोही' वृत्ती आता उघड झाली आहे. एका बाजूला आणीबाणीत तुरुंगात गेलेल्यांचा सत्कार केला जातो, तर दुसऱ्या बाजूला ज्या संविधानामुळे आपण श्वास घेत आहोत, त्या संविधानाच्या निर्मात्यांचा अवमान केला जातो. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना 'पद्म' पुरस्काराने सन्मानित केले जाते आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातो. याचा स्पष्ट अर्थ असा की, या मनुवादी भाजपला लोकशाही आणि संविधान मुळीच मान्य नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या वनविभागाच्या अधिकारी जाधव यांचेही वडेट्टीवार यांनी कौतुक केले. ‘या अन्यायाविरुद्ध वनविभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. बाबासाहेबांचा अवमान सहन न झाल्याने त्यांनी आवाज उठवला, ही प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाची भावना आहे. सरकारने माधवी जाधव यांच्यावर सूडबुद्धीने कोणतीही कारवाई करू नये. जर त्यांच्यावर कारवाई झाली, तर सरकारला महाराष्ट्राच्या जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. गिरीश महाजन आणि महाराष्ट्रद्रोही भाजपचा त्रिवार निषेध’.
Web Summary : Vijay Wadettiwar criticizes BJP's Girish Mahajan for omitting Dr. Ambedkar's name during a Republic Day speech, calling it an insult to the constitution. He praised officer Madhavi Jadhav, who questioned Mahajan, warning the government against retaliatory actions.
Web Summary : विजय वडेट्टीवार ने गणतंत्र दिवस भाषण में डॉ. आंबेडकर का नाम छोड़ने के लिए भाजपा के गिरीश महाजन की आलोचना की, इसे संविधान का अपमान बताया। उन्होंने अधिकारी माधवी जाधव की सराहना की और सरकार को चेतावनी दी।