माघ अमावास्येला होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण पाळायचे की नाही? पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली महत्वाची माहिती
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 15, 2026 13:23 IST2026-02-15T13:22:37+5:302026-02-15T13:23:40+5:30
Solar Eclipse 17 February 2026 India: १७ फेब्रुवारीचे सूर्यग्रहण भारतात दिसणार का? दा.कृ. सोमण यांनी दिली महत्त्वाची माहिती!

माघ अमावास्येला होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण पाळायचे की नाही? पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली महत्वाची माहिती
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे: येत्या मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी माघ अमावास्येच्या निमित्ताने होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय खगोलप्रेमींना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही.
सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सूर्यग्रहण प्रामुख्याने जगाच्या दक्षिण भागात दिसणार आहे. यामध्ये आफ्रिका खंडाचा दक्षिण भाग, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण प्रदेश, अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर हे भाग असणार आहेत. भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेध किंवा नियम पाळण्याची गरज नसल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते.
३ मार्चचे चंद्रग्रहण भारतात दिसणार!
सूर्यग्रहण दिसणार नसले तरी, खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच मंगळवार, ३ मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. हे ग्रहण 'ग्रस्तोदित' स्थितीत असेल, म्हणजेच भारतात जेव्हा चंद्र उगवेल, तेव्हा तो आधीच ग्रहणाच्या स्थितीत असेल. त्यामुळे चंद्र उगवतानाच ग्रहणाचे दृश्य भारतीयांना पाहता येईल.