"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:09 IST2025-05-15T18:07:31+5:302025-05-15T18:09:16+5:30
Foxconn HCL Project: फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले

"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
Foxconn HCL Project: वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची परिस्थिती दिसत आहे. या कंपनीसंदर्भात महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला हलवल्याचा आरोप केला जात होता. फॉक्सकॉन ही परदेशी सेमीकंडक्टर कंपनी आहे. ही कंपनी देशातील वेदांता कंपनीसोबत सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट बनवणार होती. सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. पण नंतर तो प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा आरोप आला. गुजरातमधील प्रकल्प रद्द झाल्यावर फॉक्सकॉन HCL सोबत हा प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशला हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारला सवाल केला आहे.
"महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला आहे. प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ हजार ७०६ कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून उत्तर प्रदेशातील २ हजार नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आधी महायुती सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरात देऊन गुटगुटीत केले, आता उत्तर प्रदेशला पुरवले जात आहे. एक काळ होता लोक महाराष्ट्रात लोक रोजगारासाठी यायचे. आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या असं सरकारला वाटत आहे का?" असा संतप्त सवाल रोहिणी खडसे यांनी विचारला आहे.
दरम्यान, वेंदाता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातमध्ये यशस्वीपणे होऊ शकला नाही. कारण फॉक्सकॉन आणि वेदांता समूहामध्ये जो संयुक्त उद्यम होणार होता, तो ब्रेक झाला. वेदांता आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर फॉक्सकॉनने आता HCL सोबत प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
काय आहे प्रकल्पाचे वैशिष्ट्य?
- जेवरमध्ये उभारण्यात येणाऱ्या फॉक्सकॉन-HCLच्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी ३७०६ कोटींची गुंतवणूक होणार आहे.
- प्रकल्पातून २००० नागरिकांना रोजगार मिळणार आहे.
- प्रत्येक महिन्याला ३.६ कोटी डिस्प्ले ड्राईवर चिपचे उत्पादन होणार आहे. ही चिप मोबाईलच्या डिस्प्लेसाठी आवश्यक असते.